पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ आणू नका ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ सप्टेंबर । देशात कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. यंदाही सण-उत्सव घरातच साजरे करा, सणांचा पारंपरिक जल्लोष साजरा करण्यासाठी आपल्याला आणखी वाट पाहावीच लागेल. तोंडावरचा मास्क काढण्याची वेळ अजून आलेली नाही, अशा स्पष्ट शब्दांत सरकारने देशातील जनतेला सावध केले आहे. ज्या लोकांना एकत्र येणे अत्यावश्यक असेल त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले पाहिजे, असे केंद्राने म्हटले आहे.

केंद्र सरकार जनतेला सावध करत असतानाच, अनेकजण कोरोना संपलाय अशा गोड समजुतीत आहेत आणि ही मंडळी कोरोनाच्या नियमांचे पालन करत नसल्याचं दिसून आल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय. पुण्यात पत्रकारांशी बोलत असताना पवार यांनी कोरोनाचे नियम पाळले जात नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी पुन्हा सगळं बंद करण्याची वेळ शासनावर आणू नका असा इशाराही दिला आहे.

अजित पवार म्हणाले की ग्रामीण भागातील लोकांना कोरोनाची भीतीच राहिलेली नाही. मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे या नियमांचा विसर पडल्याचे दिसून येत असून यामुळे या भागांमध्ये पुन्हा संख्या वाढायला लागली असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी निर्बंध पाळण्याचे आवाहन केल्यानंतर काहीजण त्यावरून राजकारण करतात , काही जण सण साजरे करायचा प्रयत्न करतात हे थांबलं पाहिजे असे अजित पवार यांनी म्हटले. नियमांचे पालन न करणाऱ्यांना इशारा देताना अजित पवार म्हणाले की ‘तिसरी लाट आल्यानंतर ये रे माझ्या मागल्या करून सगळं बंद करण्याची वेळ शासनावर कृपया आणू नका’

देशातील कोरोना महामारीच्या सद्यस्थितीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. या वेळी सणासुदीत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारी कायम राखण्याबाबत विविध सूचना करण्यात आल्या. सण-उत्सवांमध्ये गर्दी करणे कटाक्षाने टाळलेच पाहिजे. कोरोनाची लस घेतलीय म्हणून निष्काळजी वागून चालणार नाही. लस घेतल्यानंतरही तोंडावर मास्क लावलाच पाहिजे. अत्यावश्यक कारणांसाठी एकत्र जमण्याची नितांत गरज असेल तर त्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले असले पाहिजेत, असे इंडियन काwन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *