महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.४ सप्टेंबर । जागतिक वारसा स्थळ व जैवविविधतेचे आगार असलेल्या कास पठारावरील फुलांच्या जीवनमानात बदल होत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष स्थानिक अभ्यासकांनी काढला आहे. ऑक्टोबरमध्ये येणारी फुले यंदा ऑगस्टमध्ये उमललेली एकीकडे दिसत असताना दुसरीकडे मात्र ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये फुलणारी गेंद, सीतेची आसव इत्यादी फुलांचा अद्यापही बहर आलेला नाही. त्यामुळे कासच्या फुलांच्या जीवनमानात खरोखरच बदल होतोय का? याबाबत तज्ञांनी निष्कर्ष काढण्याची गरज निर्माण झाली आहे.
कास पुष्प पठारने पर्यटनाच्या क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक नकाशावर सातारा जिल्ह्याचा लौकीक नोंदवला आहे. सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून समाविष्ट करण्यात आले आहे. सध्या कास पठार हे विविध जातींच्या फुलांनी बहरत आहे. पठारावर पश्चिम घाटातील अत्यंत दुर्मिळ असलेल्या सुमारे 850 पेक्षा अधिक पुष्प वनस्पतींचे प्रकार आढळून आले आहेत. यामध्ये औषधी वनस्पतींचा अधिक समावेश आहे.
तसेच किटक व विविध प्रकारच्या फुलपाखरांच्या 32 प्रजाती आढळतात. सरपटणार्या प्राण्यांच्या 19 प्रजाती, सस्तन प्राण्याच्या 10 प्रजाती आणि पक्षांच्या 30 प्रजाती येथे आढळून येतात. कास पठार व परिसरात प्रदेशनिष्ठ, दुर्मिळ व अतिदुर्मिळ वनस्पती आहेत. रेड डाटा बुकमध्ये जवळपास 40 फुले असणार्या प्रजाती कास पठारावर आढळतात. कास पठारासारखेच आणखी जवळपास 16 सडे आजूबाजूला आहेत. वेगवेगळी फुले, वनस्पतींबरोबरच पर्यटकांसाठी छोटे-मोठे झरे, धबधबे हे कास परिसराचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे. मात्र, पठारावरील फुलांच्या जीवनमानात काही बदल होत असल्याचा प्राथमिक दावा काही अभ्यासकांनी केला आहे.