महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ सप्टेंबर । माजी गृहमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) लूकआऊट नोटीस जारी केली आहे. १०० कोटींच्या वसुली प्रकरणात त्यांना लवकरच अटक केली जाईल. ईडी त्यांच्या मागावर आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ईडीने पाच वेळा समन्स बजावूनही देशमुख चौकशीसाठी एकदाही हजर झाले नाहीत. वकिलामार्फत त्यांनी वारंवार वेळ मागवून घेतला. गेल्या आठवड्यात सीबीआयचा अंतर्गत अहवाल फोडण्यासाठी लाच दिल्याच्या आरोपावरून देशमुखांचे वकील आनंद डागा, सीबीआय उपनिरीक्षक अभिषेक तिवारी यांना सीबीआयने अटक केली आहे. डागाची कसून चौकशी सरू आहे.
परदेशी जाण्यास मज्जाव : लूकआऊट नोटीस जारी केल्याने देशमुखांना परदेशी जाता येणार नाही. या नोटिसीमुळे देशभरात त्यांना शोधण्याचे अधिकार ईडीला मिळाले आहेत. देशभरातील विमानतळावरही सूचना दिल्या.