सरकारची वचनपूर्ती: कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- मुंबई ;फेब्रुवारी:विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठाकरे सरकारने आपली वचनपूर्ती केली आहे. आमचं सरकार केवळ घोषणा करणारं नाही तर योजनांची अंमलबजावणी करणार असल्याचं सांगत कर्जमाफ झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी सोमवारी जाहीर करण्यात आली.
कर्जमाफी झालेल्या पहिल्या यादीत राज्यातील 68 गावातील शेतकऱ्यांची नावे आहेत. सुमारे 9 हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादा भुसे उपस्थित होते. ज्या शेतकऱ्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला होता. त्या दोन हजार शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात पैसे वळते करण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्याची यादी पालकमंत्री यांना सुपूर्द करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. एप्रिल अखेरपर्यंत या योजनांची अमलबजावणी होण्याची शक्यता आहे. 15 हजार 358 शेतकऱ्यांची नाव पहिल्या यादीत आहेत. लवकरच कर्जमाफीचा दुसरा टप्पा मुख्यमंत्री लवकरच जाहीर करणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली होती. राज्यातील शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचे सरकारचे प्रयत्न असून, पहिली यादी 24 फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. अधिवेशनाला सुरूवात झाल्यानंतर काही तासात महाविकास आघाडी सरकारकडून शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज असणार्‍या शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणार असं वचन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. तसेच गिरणी कामगारांच्या घरासाठी 1 मार्च रोजी लॉटरी निघणार आहे. 35 लाख शेतकर्‍यांच्या कर्जखात्यांची यादी तयार केली असून, टप्प्याटप्प्याने कर्ज-माफीची अंमलबजावणी करणार आहे. कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांना तसं प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं. या अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार हे आपलं पहिलं बजेट सादर करणार आहेत. सरकारला तीन महिने झाले आता आम्ही त्यांना जाब विचारणार असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपच्या आमदारांनी आंदोलन केलं. सर्व आमदार विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसले आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली. कामकाजाला सुरुवात होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभागृहाला मंत्र्यांचा परिचय करून दिला. तर अर्थमंत्री अजित पवार यांनी सुधारणा अध्यादेश मांडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *