Rain in Maharashtra : राज्यात पुढील 2 दिवस महत्वाचे ; पावसाची तीव्रता वाढणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 8 सप्टेंबर । राज्यात गेले दोन ते तीन दिवस चांगला पाऊस (Rain) कोसळत आहे. काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली होती. आता पुढील 1 ते 2 दिवस पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तविली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस शक्य आहे. तसेच पुढील 5 दिवस राज्यात पाऊस कायम राहणार आहे. (Rainfall in Maharashtra: Intensity of rain is likely to increase in next 1 to 2 days)

पावसाने पुन्हा रुद्रावतार धारण करत मंगळवारी राज्यातील अनेक भागांना तडाखा दिला. मुंबईसह ठाण्यात सायंकाळनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी पाहायला मिळाली तर कोकणात काही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. मराठवाडा आणि विदर्भातही नद्यांना पूर आल्याने चार दिवसांत 12 जणांचा बळी गेला. तर यवतमाळमध्ये दोघे वाहून गेले. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांतही जनजीवन विस्कळीत झाले. तसेच पिकांना मोठा फटका बसला आहे.

कोकणात काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला. मुरुडमध्ये मंगळवारी 474 मिमी पावसाची नोंद झाली तर चिपळूणमध्ये 220 मिमी आणि दापोलीत 300 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला. चिपळूण, दापोलीत सर्वाधिक पाऊस झाला आहे. चिपळूणमधील वाशिष्ठी नदीचे पाणी जुना बाजार पुलापर्यंत आल्याने चिंतेचे वातावरण होते. दरम्यान, चिपळुणात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (एनडीआरएफ) पथक मंगळवारीच दाखल झाले आहे. संगमेश्वरच्या बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले आहे. राजापूर तालुक्यामध्ये संततधार पावसामुळे संभाव्य पूरस्थितीने व्यापाऱ्यांची चिंता वाढली होती. पुराचे पाणी कमी झालेय.

राज्यात पुढील 1 ते 2 दिवस पावसाची तीव्रता असेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मात्र गणेशोत्सवाच्या तयारीत असलेल्यांना दिलासाही मिळण्याची शक्यता आहे. गणेश चतुर्थीपर्यंत पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *