महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ सप्टेंबर । राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या मनसेप्रमुख राज ठाकरे राज्यभरात दौरे करत फिरत आहेत. मात्र, यावेळी राज ठाकरे यांच्यासोबत त्यांचा मुलगा अमित ठाकरे हादेखील मैदानात उतरला आहे. अमित ठाकरे यांच्याकडे नाशिक महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासाठी अमित यांनी काही दिवसांपूर्वीच नाशिकचा दौरा केला होता. त्यामुळे आगामी काळात ते मनसेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक असतील, असे संकेत मिळत आहेत.
मात्र, या सगळ्यानंतरही अमित ठाकरे हे अद्याप किती साधेपणाने वागतात, हे दाखवणारा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. amitthackeray.speaks या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आलेल्या या फोटोची सध्या प्रचंड चर्चा आहे. या फोटोत राज ठाकरे यांच्याभोवती प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचा गराडा पडलेला दिसत आहे. मात्र, त्यावेळी अमित ठाकरे आपण राज ठाकरे यांचे पूत्र असल्याचा कोणताही बडेजाव न मिरवता गाडीपाशी शांतपणे उभे आहेत.
अमित ठाकरेंचा फोटो का व्हायरल होतोय?
या फोटोतील अमित ठाकरे यांचा साधेपणा अनेकांना भावला आहे. एरवी अगदी लहानसहान नेता किंवा अगदी गावचा सरपंच म्हटला तरी त्याच्या कुटुंबीयांचा प्रचंड रुबाब असतो. मात्र, अमित ठाकरे यांच्यात असलेला साधेपणा या फोटोत स्पष्टपणे दिसत आहे.
amitthackeray.speaks हे इन्स्टाग्राम अकाऊंट चालवणाऱ्याने अमित ठाकरे यांच्या साधेपणाचे कौतुक केले आहे. बाप सरपंच असला तरी पोर बोलतं हवा फक्त आपलीच! इथे तर ह्या पोराच्या समोर जे नाव आहे ना त्या नावाने चांगले चांगले घायाळ होतात,तरी नम्रता बघा किती आहे फक्त नेता असून चालत नाही.उद्याचा नेता हा सामान्य जनतेतून घडत असतो,कोणताही गर्व न बाळगता हा एक दिवस महाराष्ट्राच भविष्य नक्की बदलेल, असे या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे.