महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ सप्टेंबर । महामेट्रो आणि पीएमआरडीएने हाती घेतलेल्या मेट्रो प्रकल्पांव्यतिरीक्त शहरातील अन्य सहा ठिकाणी मेट्रोचा विस्तार करण्यासाठी सर्वेक्षण करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. या सर्वेक्षणसाठी येणारा खर्च महामेट्रो करावा, तो खर्च राज्य सरकारकडून महामेट्रोलादेण्यात येणार आहे.
शहरात सध्या महामेट्रोकडून वनाज ते रामवाडी, निगडी ते शिवाजीनगर आणि पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर या तीन मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. वनाजपासून सुरू होणारी मेट्रो चांदणी चौकापासून सुरू करावी. तसेच रामवाडीपर्यंत धावणारी मेट्रो पुढे वाघोलीपर्यंत नेण्याची मागणी होत आहे. पुणे मनपाकडून रामवाडी ते लोहगाव विमानतळ, पुणे स्टेशन ते कात्रज, कात्रज ते शिवणे आणि वनाज ते चांदणी चौक, असे चार मार्ग सुचविण्यात आले आहे. तर लोकप्रतिनिधींकडून आठ मार्गांवर मेट्रो सुचविण्यात आले होते.
त्यावर महामेट्रोकडून सहा मार्गांचे सर्वेक्षण आणि निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पायाभूत प्रकल्प आढावा समितीच्या झालेल्या बैठकीत सहा मार्गांचे सर्वेक्षण करण्याचे ठरले होते. त्यास नगर विकास खात्याने मान्यता दिली.