महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ सप्टेंबर । ऑक्टोबरच्या अखेरीस ५ ते ११ वयोगटातील मुलांसाठी फायझर इंकची कोविड -१९ लस अधिकृतरित्या वापरासाठी येऊ शकते असा विश्वास अमेरिकेच्या मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. फाइझरने क्लिनिकल ट्रायल्समधला पुरेसा डेटा अमेरिकन फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए)कडे दिल्यानंतर त्या वयोगटासाठी आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळेल आणि त्यानंतर ऑक्टोबरच्या अखेरीस लहान मुलांना लस देणे शक्य होणार आहे. आरोग्य अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की माहिती दिल्याच्या तीन आठवड्यांत लहान मुलांसाठी लस सुरक्षित आणि प्रभावी आहे की नाही यावर एफडीए निर्णय घेऊ शकते.
कोट्यवधी अमेरिकेतील नागरिक लहान मुलांसाठी लसीची आतुरतेने वाट पाहत आहेत. विशेषत: ज्यांची मुले अलिकडच्या आठवड्यात डेल्टा प्रकारामुळे संक्रमित झाली होती त्यांचा यामध्ये समावेश आहे. व्हाइट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. फौचींनी सांगितले की जर फाइझरने सप्टेंबरच्या अखेरीस आपला अहवाल दिला तर ऑक्टोबरपर्यंत फायझर उत्पादन तयार करु शकेल.
फौचींनी सांगितले की मॉडर्ना इंक ५-११ वयोगटातील मुलांची माहिती गोळा आणि विश्लेषण करण्यासाठी फायझरपेक्षा सुमारे तीन आठवड्यापेक्षा जास्त वेळ घेईल. मॉडर्ना लसींचा निर्णय नोव्हेंबरच्या आसपास येऊ शकतो, असा त्यांचा अंदाज आहे.
अमेरिकेत डेल्टा प्रकारामुळे करोनाच्या बाधितांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. अशा परिस्थितीत, फायझर आरोग्य तज्ञांचा असा दावा आहे की १२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी ही लस लवकरच मंजूर होईल. सीएनबीसीशी बोलताना अन्न आणि औषध प्रशासनाचे माजी आयुक्त स्कॉट गॉटलीब यांनी अमेरिकेचा आरोग्य विभाग लवकरच ५ ते ११ वर्षे वयाच्या मुलांसाठी लसीला मंजूरी देईल अशी आशा व्यक्त केली होती.
अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये शाळा उघडल्या गेल्या असताना, मुलांना तेथे मास्क घालणे बंधनकारक आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत मुलांमध्ये संसर्ग झपाट्याने वाढला आहे. ज्यामुळे अनेक मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. यूएसए सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेंशन (सीडीसी) नुसार, देशाच्या उत्तर भागात करोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, तर मागील वर्षी दक्षिण राज्यात संक्रमणाचा दर जास्त होता.