महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ सप्टेंबर । खाद्यतेलाचे भावात नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकार विविध उपाययोजना करत असून जून, जुलैमध्ये खाद्यतेल आयात शुल्कात घट केल्यानंतर आता पुन्हा १० सप्टेंबरला आयात शुल्कात पाच टक्के कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतमालाच्या भावाला फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
जून महिन्यात पामतेल आयात शुल्कात पाच टक्के कपातीचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. जुलै महिन्यात सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या आयात शुल्कात साडेसात टक्के घट करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता सप्टेंबर महिन्यात सर्व प्रकारच्या खाद्यतेलांवर पाच टक्के घट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे क्रूड पामोलीन, कच्च्या सोयाबीन तेलावरील आयात शुल्क आता ३०.२५ टक्क्यांवरून २४.७५ टक्के, सूर्यफूळ आणि पक्क्या सोयाबीन तेलावरील आयात शुल्क ४१.२५ टक्क्यांवरून ३५.७५ टक्के होणार आहे.
या निर्णयामुळे क्रूड पामोलीनच्या एका किलोमागे ४ रुपये १८ पैसे, पामतेल ४ रुपये ३२ पैसे व पक्के सोयाबीन ४ रुपये ९९ पैशाने कमी होणे अपेक्षित आहे. सोयाबीन बाजारपेठेतील भावावर याचा १०० रुपये क्विंटलमागे फरक होणे अपेक्षित आहे. सोयाबीनचे भाव १० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत चढे होते, ते आता घसरत महाराष्ट्रात आठ हजार, तर मध्य प्रदेशात सहा हजार रुपये प्रति क्विंटल आहेत. केंद्र सरकारने जनुकीय बदल केलेले पशुखाद्य (सोया पेंड) १२ लाख टन ३१ ऑक्टोबरपूर्वी आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयामुळे तेलबियांचे भाव पडतील. मात्र, तेलाचे भाव कमी होतील की नाही हे सांगणे अवघड आहे. कारण परदेशातील निर्यातदार आयात शुल्क कपातीचा लाभ उठवत भाव वाढवतात. त्याचा फायदा दलाल आणि त्या देशांतील शेतकऱ्यांना होतो. देशांतर्गत ग्राहकांना आणि शेतकऱ्यांच्या पदरात मात्र निराशाच पडते.