पेट्रोल-डिझेल ‘जीएसटी’च्या कक्षेत ? सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ सप्टेंबर । वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पेट्रोल आणि डिझेलला वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी कर कक्षेत आणण्याचा महत्त्वपूर्ण मुद्दा शुक्रवारी (१७ सप्टेंबर) लखनऊ येथे आयोजित ‘जीएसटी परिषद’ या सर्वोच्च निर्णायक मंडळाच्या बैठकीच्या विषय पत्रिकेवर असू शकेल.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील आणि राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा सहभाग असलेल्या जीएसटी परिषदेच्या या बैठकीत, ‘एक राष्ट्र, एक दर’ या धोरणाअंतर्गत पेट्रोलियम उत्पादनांवर एकसामाईक कर लावण्याचा मुद्दा चर्चेला घेतला जाऊ शकतो. मात्र यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांना या निर्णयाची मोठी किंमत मोजावी लागू शकते आणि करोनामुळे आधीच तिजोरी खंगली असताना, पेट्रोल-डिझेलवरील करापोटी मिळणारा मोठा महसूल गमवावा लागू शकतो. याच बैठकीत करोनावरील उपचारांसाठी आवश्यक असणाऱ्या औषधी व सामग्रीवरील कमी केल्या गेलेल्या कराचा कालावधी आणखी वाढवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

देशात जीएसटी लागू करण्यात आला त्यावेळी पेट्रोल, डिझेल, विमानसांठी वापरले जाणारे इंधन (एटीएफ), नैसर्गिक वायू आणि खनिज तेल या पाच पेट्रोलियम वस्तूंना सध्याच्या जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आले आहे.

जीएसटी परिषदेची ही ४५ बैठक असून, २० महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर ही प्रत्यक्ष आमनेसामने चर्चा घडणारी बैठक होत आहे. या आधी करोना टाळेबंदीच्या आधी १८ डिसेंबर २०१९ ला प्रत्यक्ष बैठक पार पडली होती. नंतर पुढच्या कालावधीतील बैठका या ऑनलाइन धाटणीत घेतल्या गेल्या आहेत.

दर निम्म्याने घटतील…

सध्या पेट्रोल-डिझेलवर केंद्र सरकार उत्पादन शुल्क आणि राज्य सरकारकडून मूल्यवर्धित कर (व्हॅट) आणि उपकर आकारला जातो. करांवरील करांचा पेट्रोल-डिझेलच्या विक्री किमतीवर विपरीत प्रभाव पडत असून, या इंधनांच्या प्रति लिटर किमतीत करांचाच वाटा ६० ते ६२ टक्के इतका आहे. म्हणूनच पेट्रोल-डिझेलला जीएसटीअंतर्गत आणले गेले तर आकाशाला भिडलेल्या त्यांचे दर निम्म्याने कमी होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *