महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १५ सप्टेंबर । सोलापूर जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती पुरती खालवाल्याच दिसून येत आहे. टोमॅटोला हमीभाव न मिळाल्याने शेतकरी टोमॅटो थेट रस्त्याच्या कडेला फेकून देत आहे. सोलापूर जिल्ह्यातील पुणे- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी जागोजागी भलेमोठे टोमॅटोचे ढिगारे पडलेले बघायला मिळतं आहे.
यामुळे जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची दैना झाली आहे. टोमॅटो उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. पंधरवड्यापूर्वी ४० ते ५० रुपये किलो दराने विकणाऱ्या टोमॅटोला आज केवळ चार ते पाच रुपये भाव मिळत नसल्याने टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातला टोमॅटो रस्त्याच्या कडेला फेकून दिलाय.
या लालभडक टोमॅटोचे डोंगरांचा लालभडक चिखल रस्त्यावर पाहायला मिळत आहे. गणपती आणि महालक्ष्मीचा सण संपताच भाजीपाल्याचे भाव कमी झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक फटका हा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. टोमॅटोची आवक वाढली आणि सध्याच्या पावसाळी वातावरणामुळे टोमॅटो खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने टोमॅटोला बाजारात भाव मिळत नाही.
दुसऱ्या राज्यात पाऊस पडत असल्यामुळे तिथूनही मागणी कमी झाली आहे. बाजारामध्ये चार ते पाच रुपये किलो असा भाव मिळत असल्याने बाजारात नेऊन गाडीभाडेही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर टाकून दिला आहे.