तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी मिलिंद नार्वेकरांची नियुक्ती ; उद्धव ठाकरेंचा जगनमोहन रेड्डींना फोन

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ सप्टेंबर । देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या (Tirumala Tirupati Devasthan Trust) सदस्यांची यादी काल आंध्र प्रदेश सरकारने (Andhra Pradesh) जाहीर केली. या यादीत देशभरातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

देशातील सर्वात प्रतिष्ठित म्हणून आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती देवस्थानाची ख्याती आहे. या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यांच्या नियुक्तीसाठी देशभरातून मोठी चढाओढ असते. मात्र प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून ही नियुक्ती सुचवत असतात.

त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Maharashtra CM Uddhav Thackeray) यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय एस जगनमोहन रेड्डी ( Y S Jaganmohan Reddy) यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्यानंतर महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

आंध्र प्रदेश सरकारने त्याप्रमाणे काल अधिकृत अधिसूचना काढत तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या नवीन सदस्यांच्या नावांची यादी जाहीर केली. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर याआधीच मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग (MPL) गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची धुरा आहेच. त्यानंतर आता देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. त्यामुळे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचं वलय आता देश पातळीवर विस्तारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत. गटप्रमुख ते उद्धव ठाकरेंचे सचिव ते आता शिवसेना सचिव असा मिलिंद नार्वेकरांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मुंबई प्रीमिअर लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष म्हणून गेल्याच वर्षी मिलिंद नार्वेकर यांची निवड झाली.

मिलिंद नार्वेकर काही वर्षांपूर्वी मातोश्रीवर शाखाप्रमुख पदाच्या मुलाखतीसाठी गेले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांची नजर मिलिंद नार्वेकरांवर गेली. मिलिंद नार्वेकर यांच्यातील हुशारी, संवाद कौशल्य या गुणांमुळे मिलिंद नार्वेकरांची उद्धव ठाकरेंच्या पीए म्हणून निवड झाली. तेव्हापासून ते आजतायागत नार्वेकर हे अनेक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *