एक्सप्रेस-वेवरील टोल नाक्यांसंदर्भात नितीन गडकरींचे महत्वपूर्ण वक्तव्य

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ सप्टेंबर । आज राष्ट्रीय महामार्गांवरील टोलसंदर्भात केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महत्वपूर्ण भाष्य केले आहे. आपल्या चांगली सेवा आणि चांगले रस्ते हवे असतील, तर लोकांना पैसे द्यावेच लागतील, असे गडकरी म्हणाले आहेत. पण अगदी आपल्या खास शैलीमध्ये गडकरींनी टोलसंदर्भातील प्रश्नावर उत्तर दिले.

जर कार्यक्रम एसी हॉलमध्ये आयोजित करायचा असेल, तर भाडे द्यावेच लागणार. फुकट करायचे असेल तर मैदानात बसूनही लग्न लावता येते, असं गडकरींनी टोलसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितले. एक्सप्रेसवेवरुन प्रवास करताना टोलच्या माध्यमातून अधिक पैसे मोजावे लागतात, अशा स्वरुपाचा प्रश्न गडकरींना विचारण्यात आला होता. प्रवासाचा वेळ एक्सप्रेस-वेमुळे मोठ्या प्रमाणांमध्ये वाचतो, असेही गडकरींनी यावेळी सांगितले. दिल्लीहून मुंबईला आज एका ट्रकला जायला ४८ तास लागतात, एक्सप्रेस-वेमुळे हा वेळ १८ तासांवर येणार असल्याचे गडकरी म्हणाले.

तसेच इंधनाचीही मोठ्या प्रमाणात एक्सप्रेस-वे अधिक वेगवान असल्यामुळे बचत होते, असे मत गडकरींनी व्यक्त केले. गडकरींनी यावेळी बोलताना जगातील सर्वात मोठा एक्सप्रेस-वे भारतामध्ये उभारला जात असून त्याचा संपूर्ण देशाला अभिमान असल्याचे दिल्ली-मुंबई एक्सप्रेस-वेसंदर्भात बोलताना म्हटले आहे. या एक्सप्रेस-वेमुळे दिल्लीहून अवघ्या साडेबारा तासांमध्ये मुंबईला पोहचता येईल, असेही गडकरींनी सांगितले. या एक्सप्रेस-वेवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन्स वापरले जाणार आहे. हा मार्ग सहा राज्यांमधून जाणार असून एअर अॅम्ब्युलन्स म्हणजेच हवाई मार्गाने रुग्णांची ने आण करण्यासाठी वापर करता येईल, या दर्जाचा हा मार्ग असेल असे गडकरी म्हणाले.

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत जाऊन गडकरी यांनी दिल्ली मुंबई एक्सप्रेस-वेच्या कामाची पहाणीसुद्धा केली. यावेळी या ठिकाणी गडकरी हे हेलिकॉप्टरने पोहचले. यावेळी गडकरींनी राजस्थानमध्ये २०२३-२४ पर्यंत आम्ही अडीच हजार किलोमीटरचे रस्ते उभारणार असल्याचे गडकरींनी राजस्थानमधील अन्य एका कार्यक्रमामध्ये सांगितले. या प्रकल्पांचा खर्च ३० हजार कोटी रुपये एवढा असणार आहे.

गडकरींनी पहिल्यांदा २०१८ रोजी मुंबई- दिल्ली एक्सप्रेस-वेची घोषणा केली होती. त्यावेळी त्यांनी चंबळ एक्सप्रेस वे तयार करुन, तो मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वेला जोडणार असल्याचेही सांगितले होते. मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातील अनेक दुर्गम किंवा आदिवासी भाग या एक्सप्रेस-वेमुळे जोडले जातील, त्यामुळे या भागांचा मोठा विकास होईल, असेही गडकरी म्हणाले होते. नवीन दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे हा ग्रीनफील्ड मार्ग असेल आणि तुलनेने कमी विकसित असलेल्या प्रदेशातून जाईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली होती.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *