महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १९ सप्टेंबर । राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरात पोलीस आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मिळाली तेव्हा आनंदाला पारावर राहिला नव्हता. जगभरात नावाजलेला पुण्यातील गणेशोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होताना प्रत्यक्षात अनुभवयाला मिळणार होता. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटामुळे आनंदावर थोडेस विरजण पडले. तरीही शासनाच्या आदेशानुसार भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय करत गणेशोत्सव साजरा करताना पुणेकरांनी तसूभरही कमतरता ठेवली नाही. त्यामुळे सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणेकरांचा गणेशोत्सवातही उत्साह वाखाणण्याजोगा असल्याचे दिसून आल्याचे मत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केले आहे.
पोलीस अधिकारी म्हणून राज्यात अनेक ठिकाणी काम करताना विविध शहरांसह गावांचा जवळून अनुभव घेतला आहे. मात्र, सांस्कृतिक ठेवा, सामाजिकतेचे दर्शन अशी पुणेकरांची खरी ओळख गणेशोत्सवात दिसून आली. शासनाच्या आदेशानुसार पुणेकरांनी 10 दिवसांच्या उत्सवात पोलिसांना सहकार्य केले. विशेषतः यंदाच्या वर्षी पुण्याच्या गणेशोत्सवात झोकून द्यायचे होते. दरवर्षी मानाचे गणपतीसमोरील देखावे, समाजप्रबोधनपर व्याख्याने, नाटक, बाप्पांच्या आगमनासह विसर्जनाची लगबग पुणेकरांना आनंदाची पर्वणीच घेऊन येत होती. पंरतु, सलग दोन वर्ष कोरोनामुळे सार्वजनिक कार्यक्रमांसह गर्दीवर निर्बध आल्यामुळे सार्वजनिक मंडळांसह नागरिकांमध्ये निराशा झाली होती.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गणशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होईल, अशी अनेकांना आशा होती. मात्र, कोरोना संसर्ग रूग्णसंख्येत अचानक वाढ झाल्यामुळे पुणेकरांसह बहुतांश मंडळांना ऑनलाईन दर्शनाची सोय करत गणेशोत्सवात समाधान मानावे लागले. विशेषतः शासनाच्या नियमांचे पालन करून मंडळांनी काळजी घेतल्यामुळे दक्ष नागरिकांची जबाबदारी दिसून आली.
पुण्याचा गणेशोत्सवाची ख्याती आणि चलचित्रांचे देखावे, समाजप्रबोधनपर व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल वर्षानुवर्ष प्रासारमाध्यमातून पाहिले होते. यावर्षी पुण्यातील गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमनारे आसमंत अनुभविण्यासाठी कान आतुर झाले होते. मानाच्या गणपतींच्या आरतीसाठी कुटूंबियासह जाणे, बाप्पांचे आगमन आणि विसर्जन कालावधीतील पुण्याचा सांस्कृतिक सोहळा याची देही, याची डोळा साठवायचा मनोमन निश्चय केला होता. परंतु, कोरोनामुळे ओढावलेल्या संकटामुळे नागरिकांसह सार्वजनिक मंडळातील पदाधिकाऱ्यांना जबाबदारीने वागावे लागले. बहुतांश मंडळांनी मंडपामध्ये गर्दी होऊ न देता भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सोय करून दिली होती. पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी सूचनांचे तंतोतन पालन केले. त्यामुळे सांस्कृतिक ठेवा जपणाऱ्या पुणेकरांनी आपलेसे केल्यामुळे खऱ्या अर्थांने गणपती बाप्पांच्या चरणी लीन झाल्याचे समाधान मिळाले आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांसह सार्वजनिक मंडळांना आचारसंहितेचे पालन करावे लागले. सोशल डिस्टन्ससह सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करण्यावर भर द्यावा लागला. बाप्पांच्या आगमनासह विसर्जन मिरवणूकीला परवानगी नसल्यामुळे अनेकांची निराशा झाली. मात्र, कोरोना संसर्गाचा नायनाट करण्यासाठी प्रत्येकाला सहकार्य करणे आवश्यक होते. त्यामुळे पुणेकरांनी पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नियमांचे पालन केल्यामुळे समाधान मिळाले. कोरोनानंतर पुढील गणेशोत्सव आपण जोशात साजरा करुन समाजापुढे आदर्श निर्माण करु शकतो. गणेशोत्सवात पुणेकरांनी स्वयंशिस्त पाळण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे कोरोनाचा लवकर नायनाट होत नागरिकांचे आयुष्य पुन्हा एकदा पुर्वपदावर येवो, अशी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करतो.
पुढील वर्षीचा गणशोत्सव उत्साहात साजरा करू
पुण्यात मानाच्या गणपतींची प्राणप्रतिष्ठा, ढोल-ताशांचा निनाद, सडा, रांगोळ्या, हार-फुले, दैनंदिन पूजा अर्चा, पुणेकरांचे आदरतिथ्य अनुभवण्याची संधी मिळणार होती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, बाप्पांच्या स्वागताला तरुणाईचा जल्लोष, कौटुंबिक आनंदाचे वातावरण, सार्वजनिक गणशोत्सव मंडळांचा उत्साह पाहायला मिळणार होता. गणपतींची मिरवणूक, गणेशोत्सव मंडळांची विसर्जन मिरवणूकीसाठी लागलेल्या रांगा, भाविकांची तुडूंब गर्दी बघण्याची संधी यंदा हुकली आहे. मात्र, पुढील वर्षी नवीन जोमाने गणशोत्सव साजरा करण्यासाठी आपण बाप्पांना साकडे घालूया…गणपती बाप्पा मोरया…मंगलमुर्ती मोरया…पुढच्या वर्षी लवकर या…