केंद्र सरकार देणार दिलासा ! करोनाने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ५० हजारांची मदत देण्यास तयार

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ सप्टेंबर । करोना संसर्गामुळे देशात आतार्यंत ४ लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. करोनाने मृत्यू झाल्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. शेकडो मुलं अनाथ झाली आहेत. आता करोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या वारसांना ५० हजार रुपयांची मदत देण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शवली आहे. ही रक्कम राज्य आपत्ती निवारण निधीद्वारे दिली जाईल. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे पालन केल्यानंतर एनडीएमएने भरपाईसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.

केंद्र सरकारने या प्रकरणी सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. यानुसार देशात करोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांच्या वारसांना ५० हजारांची मदत देण्याची तयारी केंद्र सरकारने दर्शवली आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत करोनाने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ४ लाख रुपये मदत देण्याची मागणी करण्यात आलीय.

करोनाने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची भरपाई देऊ शकत नाही, असं सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारने स्पष्ट केलं. सरकारच्या या युक्तिवादाशी सुप्रीम कोर्टाने सहमती दर्शवली. तसंच सरकारने स्वतः अशी व्यवस्था तयार करावी जेणेकरून मृतांच्या वारसांना सन्माननीय रक्कम मिळाली पाहिजे, असं कोर्टाने नमूद केलं.

भूकंप, पूर यासारख्या १२ प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती या आपत्ती कायद्याच्या कक्षेत येतात. या आपत्तींमध्ये एखाद्याचा मृत्यू झाल्यास राज्य आपत्ती निवारण निधीतून ४ लाख रुपयांच्या भरपाईचे आश्वासन दिले जाते. पण करोना महामारी त्यापेक्षा वेगळी आहे, असा युक्तीवाद सरकारने सुप्रीम कोर्टाच्या नोटिशीला उत्तर देत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. सुप्रीम कोर्टानेही केंद्र सरकारचा हा युक्तिवाद मान्य केला. करोना मृतांच्या वारसांना किती रक्कम द्यायची हे सरकारने स्वतः ठरवावं. पण नुकसान भरपाई दिली पाहिजे, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आजच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात आतापर्यंत ४ लाख ४५, ७६८ नागरिकांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *