महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ सप्टेंबर । दिव्यांग आणि चालू शकत नसलेल्या लोकांना कोरोनाची लस घेण्यासाठी आता लसीकरण पेंद्रांवर जाण्याची गरज नाही. अशा नागरिकांना त्यांच्या घरातच कोरोना लसीचा डोस तसेच लक्षणे आढळल्यास त्यांची घरीच कोरोना चाचणी केली जाणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी हा निर्णय जाहीर केला. यासंदर्भात आवश्यक ती व्यवस्था आणि मदत पुरवण्याचे निर्देश सर्व राज्यांना दिले आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी गुरुवारी नवी दिल्लीतील पत्रकार परिषदेत कोरोनाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. यावेळी त्यांनी विविध निर्णय जाहीर केले. दिव्यांग नागरिक तसेच चालू शकत नसलेल्या लोकांना कोरोना चाचणी व लसीकरणाचा सहज लाभ मिळवून दिला जाणार आहे. याच हेतूने त्या लोकांना घरीच लस टोचली जाईल तसेच चाचणीही केली जाईल, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी स्पष्ट केले.
देशात कुठलाही नवीन व्हेरिएंट आलेला नाही
देशात कोविडचा कुठलाही नवीन व्हेरिएंट आलेला नाही. डेल्टाच्या नव्या अवतारांबाबत आणखी चिंतेची परिस्थिती नाही. डेल्टा हा देशाच्या चिंतेचा मुख्य विषय राहिलेला आहे. कोरोनाची दुसरी लाट डेल्टामुळेच फैलावली. अजूनही काही राज्यांत कमी प्रमाणात ही लाट आहे. तथापि, नव्या व्हेरिएंटचे कुठलेही पुरावे नसल्याचे ‘आयएनएसएसीओजी’ या संस्थेने म्हटले आहे.