महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ सप्टेंबर । अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच दोन लसमात्रा घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी असली तरीही १८ वर्षांखालील महाविद्यालयीन विद्यार्थी वा अल्पवयीनांना लोकलची दारे बंदच आहेत. त्यामुळे दोन्ही मात्रा पूर्ण केलेल्या पालकांनाही आपल्या लहान मुलांना घेऊन प्रवास करता येत नाही. असा प्रवास केल्यास तिकीट तपासनीसांकडून दंड आकारण्यात येतो. त्यामुळे नियमांचे पालन करुन १८ वर्षांखालील मुलांच्या लोकल प्रवासाबाबत तोडगा काढण्याची विनंती प्रवासी संघटनांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच दोन लसमात्रा असलेल्या सामान्यांनाही लोकल प्रवासाची परवानगी देण्यात आली. त्यात दोन लसमात्रा घेतलेल्यांना मासिक पास देण्यात येत आहे. पश्चिम रेल्वे उपनगरीय मार्गावर दोन लसमात्रा घेतलेल्या तीन लाख २३ हजार ९९४ जणांना पास, तर मध्य रेल्वे मार्गावर सात लाखांहून अधिक जणांना पास दिले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा कर्मचारी आणि दोन लसमात्रा घेतलेले अशा एकूण ३८ लाखांहून अधिक प्रवाशांचा लोकल प्रवास सध्या होत आहे. परंतु या प्रवासापासून १८ वर्षांखालील मुले-मुली प्रवास करू शकत नाहीत. त्यांचे लसीकरण झाले नसल्याने लोकल प्रवास करण्याची मुभा नाही. प्रवास जरी केल्यास त्यांना दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागते. यात पालकांचे दोन लसीकरण झाले असल्यास कामानिमित्त त्या मुलाला किंवा मुलीला सोबत घेऊन प्रवास करणे शक्य होत नाही. त्यामुळे बेस्ट, रिक्षा, टॅक्सी अशा वाहनांचा पर्याय निवडावा लागतो.
यासंदर्भात उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी प्रवासी संघटनेतर्र्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवल्याचे सांगितले. १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण नाही. त्यामुळे या मुलांना महत्त्वाच्या कामानिमित्त दोन लस घेतलेल्या पालकांसोबतही लोकल प्रवास करताना कारवाईला सामोरे जावे लागते. पाच वर्षांखालील मुलांना लोकल प्रवासाचे तिकीट आकारले जात नाही. तशा परिस्थितीत ती मुले आई-वडिलांसोबत प्रवास करू शकतील की नाही याचा स्पष्ट खुलासा अद्यापही झालेला नाही. तर पाच ते १२ वयोगटांतील मुलांना अर्धे तिकीट लागते. परंतु स्वतंत्रपणे प्रवास करू शकत नाहीत. दोन लसमात्रा घेतलेल्या आई-वडिलांसोबतही प्रवास करताना अडचणी येतात. त्यामुळे सर्व नियम पाळून त्यांना प्रवासाची मुभा द्यावी किंवा यावर अन्य पर्याय शोधून तोडगा काढावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.
लोकल प्रवासासाठी शासनाने दिलेल्या नियमानुसारच अंमलबजावणी केली जात आहे. यात अत्यावश्यक सेवा कर्मचाऱ्यांबरोबरच फक्त दोन लसमात्रा घेतलेल्यांनाच प्रवास मुभा आहे.