पुण्यात दहा रुपयांत प्रवासासाठी ४० दिवसांची प्रतीक्षा

Spread the love

महाराष्ट्र २४- पुणे – शहराच्या मध्यभागात पीएमपी बसमधून दहा रुपयांत दिवसभर प्रवास करण्यासाठी प्रवाशांना किमान ४० दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. महापालिका आणि पीएमपी प्रशासनात याबाबत संवाद झाला, तर ही योजना सुरू होऊ शकते.
महापालिकेचा २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी शहराच्या मध्यभागात प्रवाशांना दहा रुपयांत प्रवास करता येईल, अशी घोषणा केली. तिची अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त कार्यालयातून पीएमपीला पत्र पाठवावे लागेल. या योजनेसाठी पीएमपीवर किती रकमेचा बोजा पडेल, याचा हिशेब पीएमपीकडून काढण्यात येईल. ती रक्कम महापालिकेने देण्याची तयारी दर्शविल्यावर पीएमपीकडून या बाबतची प्रक्रिया सुरू होईल. अर्थसंकल्पाची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार आहे. दरम्यानच्या काळात महापालिका आणि पीएमपी प्रशासनातील चर्चा यशस्वी झाली तर, एप्रिलपासून प्रवाशांना दहा रुपयांत प्रवास उपलब्ध होऊ शकतो.

या मार्गांवर सुविधा
डेक्कन ते पुलगेट
स्वारगेट ते पुणे स्टेशन
स्वारगेट ते शिवाजीनगर (भवानी पेठ, गंज पेठ मार्गे)
स्वारगेट- टिळक रस्ता- खजिना विहीर – अप्पा बळवंत चौक- पुणे स्टेशन – पुलगेट
दहा रुपयांत बस प्रवासाची योजना प्रवाशांना उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात येईल. त्यासाठी प्रक्रिया तातडीने पूर्ण केली जाईल.
– हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती, महापालिका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *