न्यूझीलंडमध्ये खेळण्यासाठी गेलेल्या टीम इंडियाला कोरोनाचा धोका? रुग्ण सापडल्याने खळबळ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरसनं दहशत माजवली आहे. चीनच्या वुहान प्रांतात पसरलेल्या या व्हायरसची भीती सर्वांनाच आहे. आता चीनशिवाय इतर देशांमध्येही कोरोनाची लागण झालेले काही रुग्ण सापडल्यानं खळबळ उडाली आहे. चीनसह 40 देशांमध्ये  कोरोना पसरला आहे. आता न्यूझीलंडमध्येही कोरोना व्हायरसची लागण झालेली व्यक्ती सापडल्याचं समोर आलं आहे. त्यातच भारतीय संघही न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. त्यामुळे सध्या खबरदारी घेतली जात आहे. कोरोना हा संसर्गजन्य असल्यानं तो पसरण्याची भीती जास्त आहे. दरम्यान, न्यूझीलंडच्या सरकारने कोरोना पसरणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली असल्याचं सांगितलं आहे.

टीम इंडियाचा उद्यापासून दुसरा कसोटी सामना सुरू होणार आहे. पहिल्या कसोटीत भारताला पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर आता दुसरा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे. त्यातच जगभरात पसरलेल्या कोरोनामुळे वेगळीच भीती व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात असल्यानं कोरोना पसरण्याची शक्यता कमी आहे.

सध्या न्यूझीलंडमध्ये कोरोनाची लागण झालेल्या 60 वर्षीय व्यक्तीवर ऑकलंड इथं उपचार सुरु आहे. आतापर्यंत त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. तसंच एका व्यक्तीला कोरोना झाला असल्याची माहिती खुद्द पंतप्रधानांनी दिली आहे.न्यूझीलंडमध्ये कोरोना पसरू नये यासाठी तयारी करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने य़ाबाबत एक पत्रक काढलं आहे. त्यात म्हटलंय की, कोरोना न्यूझीलंडमध्ये पसरण्याची शक्यता कमी आहे. रुग्णाला एका विशेष खोलीत ठेवण्यात आलं आहे. कोरोना झालेली व्यक्ती इराणहून आली होती.

जगभरात कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या 82 हजार इतकी आहे. तर चीनमध्ये आणखी 433 जणांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. दक्षिण कोरियात कोरोना वेगाने पसरत आहे. कोरोनामुळे आतापर्यंत चीनमध्ये 2500 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *