पर्यटकांसाठी खुशखबर ! जंगल सफारीचा आनंद पुन्हा अनुभवता येणार ; राज्यातील अभयारण्ये खुली होणार,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ सप्टेंबर । राज्यातील कोरोनाचा प्रभाव कमी होत असल्यामुळे आता सरकारकडून विविध गोष्टींवरील निर्बंध उठवले जात आहेत. यामध्ये अभयारण्यात पर्यटकांसाठी लादलेली बंदीही उठवण्यात आली आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून राज्यातील जंगल सफारी पुन्हा सुरु होईल. यासाठी ऑनलाईन बुकिंगला सुरुवात झाली आहे. पावसाळ्यामुळे अभयारण्यातील पर्यटन काही काळासाठी बंद असते.

केवळ मर्यादित स्वरुपात पर्यटकांना प्रवेश असतो. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे जंगलातील सगळ्याच पर्यटनावर निर्बंध होते. मात्र, आता अभयारण्यांचे दरवाजे पुन्हा एकदा पर्यटकांसाठी पूर्णपणे खुले होणार आहेत. पेंच , बोर अभयारण्य , उमरेड -पवनी- कऱ्हाडला याठिकाणी सर्वप्रथम जंगल सफारींना सुरुवात होईल. यादरम्यान कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

चंद्रपुरातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प 5 दिवस पर्यटकांसाठी खुला
मध्यंतरी जून महिन्यात ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प पाच दिवसांसाठी पर्यटकांसाठी खुला करण्यात आला होता. राष्ट्रीय व्याघ्र प्राधिकरणाने एका आदेशाद्वारे 30 जूनपर्यंत कोअर भागात सफारी सुरू करण्यास परवानगी दिली होती. या प्रकल्पाच्या विविध 6 प्रवेशद्वारावरून दिवसाच्या 2 टप्प्यात ठरवून दिलेल्या क्षमतेनुसार पर्यटक गाड्यांना अनुमती देण्यात आली होती.

नवेगांव-नागझिरा अभयारण्यात पाच दिवसांत 75500 रुपयांचा महसूल
राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केल्यानंतर नवेगांव- नागझिरा व्याघ्र अभयारण्याकडे पर्यटकांचा ओघ वाढला होता. 26 ते 30 जून या 5 दिवसांत तब्बल 459 पर्यटकांनी अभयारण्याला भेट दिली आहे. या माध्यमातून शासनाला तब्बल 75500 रुपयांचा महसूल मिळाला होता.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतर राज्यातील सर्व अभयारण्य बंद करण्यात आली होती. मात्र, कोरोनाची लाट ओसरल्यानंतर नियम पुन्हा शिथील करण्यात आले आहेत. राज्य सरकारने राज्यातील सर्व अभयारण्य व व्याघ्र प्रकल्प उघडण्याची परवानगी दिल्यावर भंडारा-गोंदिया जिल्ह्यात विस्तारलेल्या नवेगांव- नागझिरा व्याघ्र अभयारण्याला 26 ते 30 जून या काळात पर्यटकांनी मोठ्या संख्येने भेट दिली होती. तब्बल 459 पर्यचकांनी नवेगांव- नागझिरा अभयारण्यात भेट जंगल सफारीचा आनंद घेतला. 87 वाहनांनी प्रवेश घेत वन विभागाला 75 हजार 500 रुपयांचा महसूल मिळवुन दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *