महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ सप्टेंबर । राज्य सरकारनं शाळा 4 ऑक्टोबरपासून, धार्मिक स्थळं 7 ऑक्टोबर तर चित्रपटगृहे आणि नाट्यगृहं 22 ऑक्टोबरपासून सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे. राज्य सरकार आता सर्व गोष्टी सुरु करण्यास परवानगी देत आहे. यामुळे रेल्वे प्रवासी संघटनांनी सर्वांसाठी लोकल प्रवास सुरु करण्याची मागणी केली आहे. राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा दिली आहे. इतर सर्व सुरू होत असताना सर्वांसाठी लोकल कधी सुरू होणार असा सवाल प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मधू कोटियन यांनी केला आहे.
बहुतांश नोकरदार 18- 44 वयोगटातील
15 ऑगस्टपासून लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. मात्र, 18 ते 44 वयोगटातील बहुतांश नोकरदार आहे. 45 ते 60 वयोगटातील प्रवाशांचे प्रमाण कमी आहे, तर 60 हून अधिक वयाचे प्रवासी आता प्रवास करणे टाळत आहेत. तिकीट मिळत नसून फक्त पास दिला जात असल्याची प्रवाशांची तक्रार आहे.
लोकलमधून जर महिन्यातून दोन वेळा जायचे तर महिन्याचा पास का काढायचा हा प्रश्न आहे. तसेच बहुतांश कामगार 18 ते 44 वयोगटातील असल्याने त्यांना जूनमध्ये पहिला डोस मिळाला आहे. त्यांपैकी काहीजणांचे दोन डोस अद्यापही पूर्ण झालेले नाहीत. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद आहे.
राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे काम सुरू असून ती लवकरच जाहीर करण्यात येईल. टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली