महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ सप्टेंबर । येत्या घटस्थापनेपासून महाराष्ट्रातील सर्व धार्मिक स्थळे उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने वारकरी भाविक अन पंढरीतील व्यापाऱ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. दरम्यान मंदिर समितीने दर्शन मंडप आणि मंदिराची साफसफाई हाती घेतली असून युद्धपातळीवर हे काम सुरु आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 5 एप्रिल 2021 पासून पंढरपूरचे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते. या दरम्यान आलेल्या यात्रा देखील प्रातिनिधिक स्वरुपात साजऱ्या केल्या गेल्या. मंदिरे उघडा यासाठी वारकरी भाविकांतून मागणी होत होती याची दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या 7 ऑक्टोबर पासून काही अटी नियम घालून मंदिर उघडण्यास संमती दिली आहे. दरम्यान मंदिर व्यवस्थापनाला भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची विशेष सूचना दिल्या आहेत. मंदिर उघडण्याने कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. दर्शनाबाबत शासनांकडून अद्याप सविस्तर खुलासा आला नसल्याने दर्शन पदस्पर्श करुन असणार की मुखदर्शन यावर निर्णय झालेला नाही.