महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ सप्टेंबर ।. गेल्यावर्षी कोरोनाकाळात सोन्याच्या किंमतीने विक्रमी पातळी गाठली होती. मध्यंतरीच्या काळात सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली होती. त्यानंतर सोन्याची किंमत एका विशिष्ट टप्प्यातच अडकून पडली होती. मात्र, गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. परिणामी सोने सार्वकालिक उच्चांकापेक्षा तब्बल 10 हजार रुपयांनी स्वस्त मिळत आहे. (Gold and Silver latest price)
स्थानिक बाजारपेठांमध्ये रविवारी सोन्याचा प्रतितोळा दर 45,240 रुपये इतका होता. तर चांदीचा प्रतिकिलो दर 59,900 रुपये इतका होता. सप्टेंबर महिन्यातील ही सोन्याची निचांकी पातळी आहे. सध्या पितृपक्ष सुरु असल्याने सोन्याची खरेदी आणखी खालावून किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. यानंतर दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होऊ शकते. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या सध्याचा काळ हा सोने खरेदीसाठी उत्तम संधी असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
लसीकरणाचा वाढलेला आणि अर्थव्यवस्थेतील सुधारणेमुळे भारतात सोन्याचे भाव कमी होत आहेत. याशिवाय, अमेरिकन फेडरल बँकेकडून देण्यात आलेल्या व्याज दरवाढीच्या संकेतांमुळेही सोन्याच्या किंमतीवर दबाव दिसून येत आहे.
डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव 52 हजारांपर्यंत पोहोचणार?
गेल्या काही महिन्यांपासून सोन्याचा दर एका विशिष्ट पातळीत वरखाली होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींमुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव असून सोने 46 हजारांच्या खाली आले आहे. आगामी काळ सणासुदीचा असल्याने सोन्याचे भाव पुन्हा वरच्या दिशेने प्रवास करु शकतात. डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा भाव पुन्हा 52 हजार रुपये प्रतितोळा इतका होईल, असेही सांगितले जात होते.
पाच वर्षात सोनं 90 हजारांवर?
आगामी काळात सोन्याचा प्रवास पुन्हा वरच्या दिशेने सुरु होईल, असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एवढेच नव्हे तर आगामी पाच वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून (Quadriga Igneo Fund) देण्यात आले आहेत.
याच काळात आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस (Stimulus Package) दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.