अखेरच्या चेंडूवर रोमहर्षक विजय, आठव्या विजयासह धोनी सेना पहिल्या स्थानावर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ सप्टेंबर । मागील मोसमात सुमार कामगिरी करणाऱया महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने यंदाच्या आयपीएल मोसमात कात टाकली आहे. चेन्नई सुपरकिंग्सने रविवारी कोलकाता नाईट रायडर्सवर अखेरच्या चेंडूवर थरारक विजय मिळवत गुणतालिकेत 16 गुणांसह पहिल्या स्थानावर धडक मारली. चेन्नई सुपरकिंग्सचा हा या स्पर्धेतील आठवा विजय ठरला. त्यांनी प्लेऑफच्या दिशेने पाऊल टाकले. कोलकाता नाईट रायडर्सला मात्र सहाव्या पराभवाला सामोरे जावे लागले.

कोलकाता नाईट रायडर्सकडून मिळालेले 172 धावांचे आव्हान चेन्नई सुपरकिंग्सने आठ गडी गमावत पूर्ण केले. ऋतुराज गायकवाड (40 धावा), फाफ डय़ुप्लेसीस (43 धावा), मोईन अली (32 धावा) व रवींद्र जाडेजा (22 धावा) यांनी चेन्नई सुपरकिंग्सच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कोलकाता नाईट रायडर्सकडून सुनील नारायणने 41 धावा देत तीन फलंदाज बाद केले.

गिल, मॉर्गन अपयशी

कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर शुभमन गिल 9 धावांवरच धावचीत झाला. युवा फलंदाज वेंकटेश अय्यर याने आपल्या आक्रमक शैलीत फलंदाजी करताना 15 चेंडूंत 18 धावांची खेळी साकारली. शार्दूल ठाकूरने त्याला बाद केले. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार ओएन मॉर्गन यालाही सूर गवसला नाही. जोश हेझलवूडने त्याला आठ धावांवर बाद केले.

राहुल, नितीश, रस्सेल, कार्तिकची चमक

तिसऱया क्रमांकावर फलंदाजी करणाऱया कोलकाता नाईट रायडर्सच्या राहुल त्रिपाठीने 33 चेंडूंत एक षटकार व चार चौकारांसह 45 धावांची खेळी साकारली. रवींद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर त्रिफळीचीत झाला. नितीश राणा (नाबाद 37 धावा), आंद्रे रस्सेल (20 धावा) व दिनेश कार्तिक (26 धावा) यांच्या शानदार फलंदाजीमुळे कोलकाता नाईट रायडर्सला 6 बाद 171 धावा करता आल्या. चेन्नई सुपरकिंग्सकडून शार्दूल ठाकूरने अवघ्या 20 धावांच्या मोबदल्यात दोन फलंदाज बाद केले. जोश हेझलवूडने दोन व रवींद्र जाडेजाने एक फलंदाज बाद केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *