उत्तर सोलापुरात पावसाचा मोठा तडाखा ; शेतीचे प्रचंड नुकसान

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ सप्टेंबर । सोलापूर – काल रात्रभर उत्तर सोलापूर Solapur तालुक्यातील रानमसले गावाला ढगफुटी सदृश्य पावसाने Rain झोडपले. उत्तर सोलापूर तालुक्यात गेल्या महिन्यातभरात अधून – मधून पाऊस दमदार बरसला. यामुळे कांदा ,सोयाबीन, उडीद, मका, तूर पिकांना सुरुवातीस पोषक वाटणारा पाऊस आता मात्र खरीप पिकांचा कर्दनकाळ ठरला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

कांदा, उडीद ,सोयाबीन, मुग,मका,भाजीपाला पाण्यातच सडून जात आहे. यामुळे खरीप पिकांचे कोट्यावधींचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील रानमसले, वडाळा, नान्नज, पडसाळी, कळमण, गावडी दारफळ, वांगी, शेजारील खुनेश्वर, मोरवंची यापरिसरात अशीच अवस्था झाली आहे. सध्या रानमसले परिसरात शिवारात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून ओढे, नाले, विहीरी तुडुंब भरून वाहत आहेत.

कौठाळी- कळमण रोडावरील पुलावर पाणी गेल्याने कौठाळी गावचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. तसेच रानमसले – खुनेश्वर , रानमसले -पडसाळी, रानमसले – वांगी रस्त्यावर वांगिरा आणि डोहिरा ओढा दुथडी भरुन वाहत असल्याने वाहतुक ठप्प झाली आहे.गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. धान्य, संसारोपयोगी साहित्य या पावसाने भिजले आहे. याबाबत महसूल विभागाकडून घरांचे आणि नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *