देशात ग्रामीण भागात आजही बँकिंग सेवेची कमतरता : निर्मला सीतारामन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ सप्टेंबर । देशातील अनेक ग्रामीण भागांत प्रत्यक्ष बँक शाखांची आजही कमतरता आहे. भारतीयबँक संघटनेने प्रत्येक तालुक्यात बँकिंग प्रणाली मजबूत करण्यावर भर द्यायला हवा. त्यासाठी सर्व शाखांचे डिजिटल मॅपिंग करावे. कुठे प्रत्यक्ष बँक असायला हवी, कुठे डिजिटल माध्यमातून सेवा द्यायच्या याचा अभ्यास करावा, असे सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी समाजाच्या सर्व घटकांना बँकिंग प्रणालीत आणण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना हातभार लावावा, असे आवाहन केले. भारतीय बँक संघटनेच्या ७४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या.

एकीकडे डिजिटायझेशनचे फायदे अधोरेखित करतानाच त्याच्या मर्यादा आणि वित्तीय सेवेतील भौगोलिक अनियमिततेवरही अर्थमंत्री सीतारामन यांनी यावेळी भाष्य केले. कोरोना काळात बँका देशाच्या दुर्गम भागातील लोकांच्या मदतीसाठी कार्यरत असल्याबद्दल बँकिंग क्षेत्राचे कौतुक करून सीतारामन म्हणाल्या की, महामारीच्या काळात डिजिटल बँकिंग व्यवस्थेचा फायदा ग्राहकांना झाला. त्यामुळे भारतीय बँकिंगचे दीर्घकालीन भविष्य, मोठ्या प्रमाणावर डिजिटल व्यवस्थेवर अवलंबून आहे.

कोरोना काळात जगभरातील बँका ग्राहकांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. मात्र, डिजिटायझेशनमुळे भारतीय बँका खातेदारांपर्यंत पोहोचू शकल्या. कोरोनाच्या काळातच कोणत्याही मतभेदांशिवाय बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पार पडली. अर्थव्यवस्थेच्या बदलत्या स्वरूपामुळे नवी आव्हाने उभी राहत आहेत. त्यामुळे देशाला अनेक नव्हे तर एसबीआयसारख्या चार-पाच मोठ्या बँकांची आवश्यकता असल्याचे मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *