आशिया चषकाचं यजमानपद पाकिस्तानकडेच, फक्त स्पर्धेचं ठिकाण बदललं !

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – मुंबई : भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डात सुरु असलेल्या सुंदोपसुंदीवर अखेरीस तोडगा निघालेला आहे. आशिया चषकाचं यजमानपद अखेरीस पाकिस्तानकडेच राहणार असून स्पर्धा पाकिस्तान ऐवजी दुबईत खेळवली जाणार आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे, ते पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते. आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत यंदाच्या आशिया चषकाच्या यजमानपदाचे हक्क पाकिस्तानकडे देण्यात आलेले होते. मात्र भारतीय संघाने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्यामुळे या स्पर्धेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं होतं.

यंदाचा आशिया चषक दुबईत खेळवला जाईल, आणि भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ या स्पर्धेत खेळतील. आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीला रवाना होण्याआधी गांगुलीने पीटीआय वृत्तसंस्थेला माहिती दिली. ३ मार्चला दुबईत आशियाई क्रिकेट परिषदेची बैठक पार पडली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपले यजमानपदाचे हक्क सोडण्यास तयार नव्हतं…पण अखेरीस स्पर्धेचं ठिकाण बदलण्याच्या निर्णयावर तोडगा काढण्यात आला. ज्याला पाक क्रिकेट बोर्डानेही होकार कळवल्याचं समजतंय.

दहशतवादाच्या मुद्द्यावरुन भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये सध्या क्रिकेट मालिका खेळवली जात नाहीये. पाकिस्ताननेही काही दिवसांपूर्वी श्रीलंका आणि बांगलादेश या संघांना पाकिस्तानात आमंत्रित करत कसोटी मालिकेचं यशस्वी आयोजन करुन दाखवलं होतं. २०१२-१३ सालानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात द्विपक्षीय मालिका खेळवली गेलेली नाही. मध्यंतरी काही माजी पाकिस्तानी खेळाडूंनीही भारत-पाक मालिका सुरु करणं गरजेचं असल्याचं म्हटलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *