राज्य सरकारचे निर्देश; 15 ऑक्टोबरपूर्वी महामार्गांची दुरुस्ती करा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ सप्टेंबर । राज्यातील महामार्गांची (Highway) दुरवस्था झाली असून राज्य सरकारने याची दखल घेतली आहे. राज्यातील खराब झालेल्या सर्व महामार्गांची 15 ऑक्टोबरपूर्वी तातडीने दुरुस्ती करा असे निर्देश राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

अतिवृष्टीमुळे मुंबई-नाशिक (Mumbai-Nashik Highway) आणि मुंबई-गोवा महामार्गासह (Mumbai-Goa Highway) राज्यातील सर्व महामार्गांची अवस्था खराब झाली आहे. या सर्व महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीसाठी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील सर्वच महामार्गांवर खड्ड्यांचं साम्राज्य असून नागरिक आणि वाहनधारकांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांनीही महामार्गावरील खड्ड्यांबाबत तक्रार केली होती. मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनीही खड्ड्यांमुळे आपल्याला पाठिचा त्रास होत, त्यामुळे मुंबई-नाशिक प्रवास टाळणार असल्याचं विधान केलं होतं.

मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्ष रखडला आहे त्यातच अतिवृष्टीमुळे या महामार्गाची चाळण झाली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमन्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागला होता. अशीच काहीशी अवस्था मुंबई-नाशिक महामार्गाचीही आहे. राज्यातील प्रमुख रस्ते अक्षरश: खड्डेमय झाले आहेत. आजच्या बैठकीत याची दखल घेण्यात आली आणि महामार्गाच्या दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत.

महाराष्ट्रातील सुमारे 18 हजार कि.मी. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाची आणि देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *