महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ सप्टेंबर । तब्बल दोन वर्षे पाच महिन्यांनंतर राज्यातील मंदिरे ७ सप्टेंबर शारदीय नवरात्रोत्सापासून उघडण्यास सरकारने परवानगी दिल्याने साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावरील ग्रामस्थांसह नांदुरी येथील व्यवसायिकांसह आदिमायेच्या भक्तांनी आनंद व्यक्त केला आहे.
आदिशक्ती सप्तशृंगीमातेचे मंदिर कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून भाविकांना बंद करण्यात आले होते. तेव्हापासून मंदिर बंदच असल्यामुळे एप्रिल महिन्यातील आदिमायेचा वर्षातील प्रमुख उत्सव असलेला चैत्रोत्सव यात्राही रद्द करण्यात आली होती. मागील वर्षीही मार्चमध्येच कोविडच्या पहिल्या लाटेत मंदिर बंद करण्यात आले होते. कोविडच्या दुसऱ्या लाटेतही एप्रिल महिन्यातील चैत्रोत्सव यात्रा रद्द करण्यात आल्याने भाविकांना सलग तीन यात्रोत्सवांना मुकावे लागले होते. या कालावधीत शेकडो वर्षांची असलेली पदयात्रा, पालखी यात्रा, कावड यात्रेची परंपरा खंडित झाल्याने भाविकांच्या मनातील हुरहूर कायम होती. दरम्यान, दुसरीकडे सुमारे चार हजार लोकसंख्या असलेल्या सप्तशृंगगडासह नांदुरी येथील व्यवसायिकांसह वाहनधारकांची सर्व अर्थव्यवस्थाही भाविक व पर्यटकांवरच अवलंबून असल्याने या कालावधीत झालेल्या यात्रोत्सावात गडावर एकही भाविक येऊ न शकल्याने गडावरील सर्व अर्थचक्र थांबले होते. सुमारे तीनशेच्या वर छोटे- मोठे व्यावसायिक व त्यांच्यावर अवलंबून असलेले कामगार व ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली होती.
दरम्यान, उत्पन्न देणारे तीन महत्त्वाचे उत्सव हातातून गेले असले तरी ७ सप्टेंबरला आदिमाया सप्तशृंगीच्या शारदीय नवरात्रोत्सवापासून मंदिर उघडणार असल्याने नांदुरीसह गडावरील व्यावसायिक व खासगी वाहनधारक, ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. शासनाच्या निर्णयाचा आनंद व्यक्त केला आहे.
केंद्र शासनाने धार्मिक स्थळांना निर्धारित दिलेल्या कोविड १९ संदर्भीय विविध मार्गदर्शक सूचना व मार्गदर्शक तत्त्व विचारात घेता, सर्व भाविकांसाठी श्री भगवती मंदिरात प्रवेश करताना मास्कचा वापर करणे बंधनकारक असेल. सोशिअल डिस्टन्सिंनचे पालन होण्याकामी चिन्हांकित प्रकारात दर्शन मार्गावर आखणी करणे, भाविकांनी एकाच वेळी होणारी गर्दी टाळणे, आरोग्य संदर्भीय आवश्यक त्या सर्व खबरदारीसह कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधात्मक सूचनांचे योग्य प्रकारे पालन प्रत्येक भाविकांने करून मंदिर व्यवस्थापन, स्थानिक स्वराज्य संस्था, प्रशासनास सहकार्य करावे लागणार आहे.