Gulab Cyclonic : महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम; हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ सप्टेंबर । ‘गुलाब’ चक्रीवादळाचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्याने त्याचा मोठा प्रभाव महाराष्ट्राच्या विविध भागांत जाणवत आहे. वादळाचे रुपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात झाल्यानंतर पावसाने रौद्ररूप धारण करत मंगळवारी मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्य़ांबरोबरच मुंबई, ठाणे परिसराला झोडपले आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाडय़ात दहा, विदर्भात पाच आणि नाशिकमध्ये एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, एनडीआरएफच्या टीमने ५६० हून अधिक लोकांना सुखरूप बाहेर काढले. रविवार आणि सोमवारी झालेल्या पावसामुळे दोनशेहून अधिक जनावरे वाहून गेली आणि अनेक घरांचे नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

त्यानंतर आता हवामान विभागाने बुधवारी महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे वीजांसह, जोरदार वारा आणि गडगडाटी वादळासह वेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. मुंबईतही मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस झाला आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढील २४ तासांत मराठवाडा, मुंबई आणि राज्याच्या किनारपट्टी कोकण भागात ‘अतिवृष्टी’ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मराठवाड्यामध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड, जालना आणि हिंगोली या आठ जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

गुलाब वादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम ठेवला आहे आणि बुधवारी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. कमी दाबाच्या क्षेत्रात गेलेल्या गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावाखाली पश्चिमेकडील हालचालीमुळे महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडेल. कोल्हापूर जिल्ह्यात सोमवार ते मंगळवार सकाळ दरम्यान ४.६ मिमी पाऊस पडला.

दरम्यान, पुढील ३ ते ४ तासांत रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांत वेगळ्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यांत येत्या ३-४ तासात तीव्र ते अति तीव्र पावसाची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह विजांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘गुलाब’ चक्रीवादळाच्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव ४८ तास कायम राहणार असल्याने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात अतिवृष्टीचा अंदाज असून विदर्भ, उत्तर कोकणातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *