प्रॉव्हिडंट फंडांवरील व्याजदर यंदा घटणार?

Spread the love

महाराष्ट्र 24 – नवी दिल्ली
चालू वर्षात नोकरदार मंडळींच्या प्रॉव्हिडंट फंडांतील (पीएफ) ठेवीवर कमी व्याजदर मिळण्याची शक्यता आहे. ‘एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन’च्या (ईपीएफओ) गुंतवणुकीवर मिळणारा परतावा कमी होणार असल्याने ही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. ‘ईपीएफओ’ आर्थिक वर्ष २०२०साठी पीपीएफमधील ठेवींवरील व्याजदर १५ बेसिस पॉइंटनी घटवून ८.५ टक्क्यांवर आणण्याचा विचार करीत आहे. आर्थिक वर्ष २०१९साठी ‘ईपीएफओ’ने ८.६५ टक्के दराने व्याज दिले होते. या मुद्द्यावर ‘ईपीएफओ’च्या केंद्रीय विश्वस्त समितीची येत्या पाच मार्चला बैठक होण्याची शक्यता आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ईपीएफओ’ला चालू वर्षी व्याजदर गेल्या वर्षीप्रमाणे देण्यात अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरात दीर्घ मुदतीच्या ठेवी, रोखे आणि गव्हर्न्मेंट सिक्युरिटीमधून ‘ईपीएफओ’ला मिळणाऱ्या उत्पन्नात ५० ते ८० बेसिस पॉइंटची घट झाली आहे. त्यामुळे यंदा कोणत्या दराने व्याज द्यायचे यावर फायनान्स इन्व्हेस्टमेंट अँड ऑडिट कमिटी बैठकीत चर्चा करण्याची शक्यता आहे. हा निर्णय ‘ईपीएफओ’च्या अस्सल नफ्याच्या आधारे घेण्यात येण्याची शक्यता आहे. या निर्णयाची माहिती संचालक मंडळाच्या बैठकीतही देण्यात येण्याची शक्यता आहे.

‘ईपीएफओ’ची गुंतवणूक

‘ईपीएफओ’ने आतापर्यंत १८ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेची गुंतवणूक केली आहे. पैकी जवळपास ४५०० कोटी रुपयांची गुंतवणूक दिवाण हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) आणि इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये (आयएल अँड एफएस) करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी गुंतवणूक करून ‘ईपीएफओ’ अडचणीत सापडली आहे. ‘डीएचएफएल’ सध्या दिवाळखोरी प्रतिबंधक कायद्याच्या प्रक्रियेतून जात असून, ‘आयएल अँड एफएस’ला वाचविण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न करण्यात येत आहेत.

‘पीएफ’वर घटते व्याजदर

‘ईपीएफओ’ने जमा झालेल्या एकूण ठेवींपैकी ८५ टक्के हिस्सा डेट बाजारात आणि १५ टक्के हिस्सा एक्स्चेंज ट्रेडेड फंडांच्या (ईटीएफ) माध्यमातून इक्विटींमध्ये गुंतवला आहे. गेल्या वर्षी मार्चपर्यंत ‘ईपीएफओ’ने इक्विटीमध्ये एकूण ७४,३२४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर १४.७४ टक्के परतावा मिळाला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारला हेही लक्षात ठेवावे लागेल की, ‘पीएफ’वरील व्याजदरांमध्ये घट झाल्यास संबंधितांना अनेक अडचणी भेडसावण्याची शक्यता आहे.

व्याज घटल्यास नकारात्मक संकेत

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘ईपीएफओ’वर मिळणारे व्याज अनेकांसाठी उपयुक्त आहे. त्यामध्ये सातत्याने घट होत गेल्यास नोकरदारांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची शक्यता आहे. सध्या ‘ईपीएफओ’चे सहा लाख सक्रिय सभासद आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *