महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३० सप्टेंबर । Chipi Airport inauguration : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ (Chipi Airport) उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. 9 ऑक्टोबरला विमानतळाचे उदघाटन होणार आहे. याची निमंत्रण पत्रिकाही तयार झाली असून या पत्रिकेवर मुख्यमंत्री ठाकरे यांचे पहिले नाव असून त्यांच्याहस्ते उद्घाटन होणार आहे. तर केंद्रीय नागरी उड्डान मंत्री (Union Civil Aviation Minister) ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindi) यांचे दुसरे नाव आहे. मंत्री राणे यांचे तिसऱ्या क्रमांकावर नाव आहे.
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ बांधून तयार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी चिपी विमानतळाचे उद्घाटन 9 ऑक्टोबर 2021 रोजी होणार आहे. यासाठी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना बोलाविण्यात आले आहे. त्यांच्या हस्ते विमानतळाचे उद्धघाटन केले जाणार आहे, अशी माहिती राणे यांनी दिली होती. त्याचवेळी एका प्रश्नाला उत्तर देताना राणे यांनी म्हटले होते, प्रत्येक कार्यक्रमाला मुख्यमंत्री असलेच पाहिजे, असं नाही.
राणे यांनी उद्घाटनाची माहिती देताना कार्यक्रमही जाहीर केला. 9 ऑक्टोबरला दुपारी 12.30 वाजचा चिपी विमानतळ वाहतूक सुरू होईल. मी आणि ज्योतिरादित्य सिंधिया विमानाने मुंबईला येऊ आणि तिथून सिंधुदुर्गला जाणार आहोत. मी ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली आणि विमानतळ उद्घाटनाचा वेळ घेतला आहे, असे राणे यांनी सांगितले होते.
राज्याचे मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे उपस्थित असणार आहेत. तर राजशिष्टाचारानुसार तिसऱ्या क्रमांकावर स्थानिक नेते आणि केंद्रीय मंत्री या नात्याने नारायण राणे यांचे नाव निमंत्रितांच्या यादीत आहे. भाजप-शिवसेनेतील श्रेयवाद आणि चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांना बोलावण्याची गरज नाही या नारायण राणे यांच्या विधानामुळे राजकीय वाद रंगला होता. मुख्यमंत्री ठाकरे यांनी बुधवारी चिपी विमानतळाच्या तयारीचा आणि कार्यक्रमाचा आढावाही घेतला. केंद्र सरकारचा सहभाग असल्याने राणे यांना निमंत्रित करणे राज्य सरकारला आवश्यकच होते.