महागाईचा झटका ; महिन्याच्या पहिल्याच दिवशी कमर्शियल एलपीजीच्या किंमतीत वाढ

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑक्टोबर । ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिकांना मोठा झटका दिला आहे. कारण, व्यावसायिक वापरासाठीच्या गॅस सिलेंडरचा (LPG) भाव वाढवण्यात आला आहे. एलपीजीचा भाव एक-दोन रुपयांनी नव्हे तर 43.50 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे खाद्यपदार्थांची दुकाने, स्टॉल्स, हॉटेल्स, रेस्टारंट किंवा ढाबे अशा सगळ्यांनाच झळ बसणार आहे. या सगळ्यांकडून खाद्यपदार्थांच्या किंमती वाढवल्या गेल्यास त्याचा अंतिम फटका सामान्य नागरिकांनाच बसणार आहे.

इंडियन ऑईलच्या माहितीनुसार, आता दिल्लीत व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीसाठी 1736.50 रुपये मोजावे लागतील. यापूर्वी ही किंमत 1693 रुपये इतकी होती. तर कोलकातामध्ये हाच दर 1805 रुपये इतका झाला आहे. आता सरकार घरगुती वापरासाठीच्या एलपीजीच्या दरातही वाढ करणार का, हे पाहावे लागेल.

CNGच्या दरातही बदल होणार?
सरकारने नैसर्गिक वायू किंवा घरगुती गॅसच्या किमतीत 62 टक्के मोठी वाढ जाहीर केलीय. नैसर्गिक वायूची किंमत आता ऑक्टोबर-मार्चच्या अर्ध्या (ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022) साठी $ 2.90 MMBTU (मेट्रिक मिलियन ब्रिटिश थर्मल युनिट्स) पर्यंत वाढली. एप्रिल-सप्टेंबर 2021 च्या अर्ध्यासाठी ही किंमत $ 1.79 प्रति MMBTU होती.

जर नैसर्गिक वायू अवघड ठिकाणांपासून तयार केला जात असेल, जेथे उत्पादन करणे अधिक धोकादायक असेल, तर किंमत $ 6.13 MMBTU निश्चित करण्यात आली. या गॅसचा वापर खत तयार करण्यासाठी, वीज निर्मितीसाठी आणि सीएनजी गॅससाठी केला जातो. अशा परिस्थितीत आता लवकरच सीएनजीदेखील महाग होणार आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर आधीच गगनाला भिडलेत. अशा परिस्थितीत आता सीएनजीची राईडही खूप महाग होण्याची शक्यता आहे.

घरगुती गॅसची किंमत प्रत्येकी सहा महिन्यांसाठी लागू
घरगुती गॅसची किंमत वर्षातून दोनदा निश्चित केली जाते, जी प्रत्येकी सहा महिन्यांसाठी लागू आहे. 30 सप्टेंबरला दर पुढील सहा महिन्यांसाठी अर्थात मार्चपर्यंत निश्चित आहे. 31 मार्चला दर पुढील सहा महिन्यांसाठी म्हणजेच 30 सप्टेंबरपर्यंत निर्धारित केला जातो. 2018-19 या आर्थिक वर्षापासून देशांतर्गत कंपन्यांनी उत्पादित केलेल्या गॅसच्या किमतीवर दबाव दिसून येत आहे. FY19 च्या एप्रिल-सप्टेंबरच्या सहामाहीत घरगुती गॅसची किंमत $ 3.69 प्रति MMBTU होती.

पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी 25 पैशांची वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्याकंडून सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ करण्यात आली आहे.हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. पेट्रोलियम कंपन्यांनी शुक्रवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.95 रुपये इतका झाला आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 97.84रुपये मोजावे लागत आहेत. दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.89 आणि 90.17 रुपये इतका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *