महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑक्टोबर । मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग २९ ऑगस्टपासून सरकारच्या संपर्कात नाहीत मुंबई मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग हे अटकेच्या भीतीने देश सोडून रशियाला पळाल्याचा संशय एनआयए, मुंबई पोलिस आणि महाराष्ट्र सरकारला आहे. अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एनआयए तपास करत असून परमबीर यांच्यावर महाराष्ट्रात विविध पोलिस स्टेशनमध्ये अॅट्राॅसिटी व खंडणीचे पाच गुन्हे दाखल आहेत. बडतर्फ सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेच्या अटकेनंतर परमबीर एकदा एनआयए ऑफिसला आले होते. दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या चांदीवाल आयोगाने परमबीर यांना अनेकदा समन्स पाठवले आहे. परंतु ते समन्सही सिंग यांना मिळालेले नाही. भितीने परमबीर युरोपातील देशात लपले असावेत, असा कयास वर्तवण्यात येत आहे. मात्र, त्यासंदर्भातील पुरावा तपास यंत्रणांना मिळालेला नाही.
शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्याभोवती रुग्णालयातही ईडीचा खडा पहारा आहे. गुरुवारी दुपारी अडसूळ यांना लाइफलाइन रुग्णालयातून गोरेगाव येथील एसव्हीएस रुग्णालयात हलवले आहे. सोबत कुटुंबीय आणि काही ईडीचे अधिकारी उपस्थित होते. २७ सप्टेंबर रोजी अडसूळ यांना ताब्यात घेण्यासाठी ईडीचे पथक त्यांच्या कांदिवली येथील निवासस्थानी गेले. मात्र त्याच वेळी अडसूळ यांची तब्येत बिघडली. त्यांना गोरेगावच्या लाइफलाइन केअरमध्ये भरती केले होते. आयसीयूमध्ये ४ दिवस उपचार करूनही त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना गुरुवारी एसव्हीएस रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अडसूळ यांच्यासोबत हॉस्पिटलमध्ये ईडीचे अधिकारीदेखील आहेत. आज दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेताना ईडीचे अधिकारी त्यांच्यासोबतच होते. अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गुरुवारी तातडीने सुनावणी करण्यात आली. याचिकाकर्ता वयस्कर आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानासुद्धा ईडीचे अधिकारी रुग्णालयाबाहेर ताबा घेण्यासाठी येत आहेत. त्यांच्यावर सुरू असलेले उपचार लक्षात घेता त्यांना अटक करू नये, अशी मागणी अडसूळ यांच्या वकिलांनी केली.दरम्यान, उच्च न्यायालयातील सुनावणीत अडसूळांना दिलासा मिळाला नाही. त्यावर शुक्रवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. न्यायालयाने अटकेपासून संरक्षण न दिल्यास ईडी अडसूळांना कोणत्याही क्षणी अटक करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ईडीचे अधिकारी समन्स घेऊन जाताच अडसूळ स्वत: रुग्णालयात भरती झाले, असा आरोप ईडीच्या वकिलांनी केला. संशयित आरोपी न्यायालयाची पायरी चढतात, याचिका दाखल करतात आणि दिलासा मागण्याचा प्रयत्न करतात. मग चौकशी कशी करायची, असा प्रश्न ईडीच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
परमबीर यांचा ठावठिकाणा लागत नाही. राज्य आणि केंद्रीय गृहमंत्रालयही त्यांचा शोध घेत आहे. ते देशाबाहेर गेल्याचे माझ्याही कानावर आले आहे. वास्तविक शासकीय अधिकाऱ्यास विनापरवानगी देश सोडता येत नाही. त्यांच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. – दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री