महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १ ऑक्टोबर । सिंधुदुर्गाच्या पहिल्या विमान उड्डाणाची प्रतिक्षा आता संपत येतेय. कारण आज महिन्याचा पहिला दिवस आहे आणि आता प्रतिक्षा आहे ती 9 ऑक्टोबरची. कारण याच दिवशी चिपी विमानतळाचं उदघाटन होणार आहे. तेही दुपारी 1 वाजता. त्याधीच शिवसेना आणि नारायण राणे यांच्यातलं राजकारण तापलेलं आहे. पण राजकारणाचा भाग थोडासा बाजूला सारला तर कोकणवासियांसाठी स्वत:च्या घरी जाण्यासाठी तेही कमी वेळेत एक चांगली सुविधा तयार होतेय. त्यामुळेच तुमचं राजकारण चालू द्या, आम्ही तिकिट बुक करुन घरी जातो असाच कोकणवासिय म्हणतोय. त्याचा पुरावा म्हणजे 15 नोव्हेंबरपर्यंतची बुकींग फुल्ल आहे.
विशेष म्हणजे चिपी विमानतळावर पहिलं लँडींगही दुपारी 1 वाजता होईल. हे विमान खास असेल. कारण हे विमान मान्यवरांसाठी असणार आहे. याच विमानातून केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि इतर मान्यवर प्रवास करणार असल्याची माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिलीय. त्यामुळेच कोकणासाठी 9 नोव्हेंबरची तारीख ही ऐतिहासिक ठरणार यात शंका नाही. कारण याच दिवशी एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधकही एकाच व्यासपीठावर येतील.