महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑक्टोबर । सध्याच्या धावत्या जीवनशैलीमध्ये भूक न लागणे, खाण्यावर लक्ष न देणे, उपाशी राहणे, रात्र रात्र भर काही न खाता राहणे, ही सर्वांमध्ये आढळून येणारी समस्या बनली आहे. बऱ्याचदा असं होतं की, आपल्यासमोर चमचमीत पदार्थ ठेवले तरी आपल्याला ते पदार्थ खाण्याचे मन करत नाही. पण असे होण्यामागचे कारण काही वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे ते म्हणजे, आपल्या दररोजच्या जीवनशैलीत होणारे बदल, काहीही कधीही खाणे, बाहेरील Junk Food खाणे, इतर ताणतणाव असणे, यामुळे भूक न लागण्याची इच्छा मरते. त्यामुळे हे काही घरगुती रामबाण उपाय आहेत ज्यामधून आपली भूक न लागण्याची समस्या नक्कीच दुर होऊ शकते.
आल्याचा रस ; आले हे पचनासाठी खूप चांगले असते. शिवाय भूक वाढवण्यासाठी आल्याचा रस हा परिणामकारक असतो. एका वाटीमध्ये एक चमचा आल्याचा रस घ्या, त्यामध्ये काळे मीठ आणि लिंबाचे 2 ते 3 थेंब घाला. आणि जेवणाच्या अर्धा तास आधी त्याचे सेवन करा.
ताजी हिरवीगार कोथिंबीर ; इतर हिरव्या भाज्यांप्रमाणे कोथिंबीर ही पौष्टिक असते. बऱ्याच घरात भाज्या, चटण्यांमध्ये कोथिंबीर टाकली जाते. आणि ही कोथिंबीर देखील भूक वाढवण्याची परिणामी ठरते. यासाठी अर्धी वाटी कोथिंबीर घ्या आणि ती नीट स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नंतर ती कोथिंबीर बारीक चिरा. आणि ती कोथिंबीर मिक्सर मध्ये वाटून घ्या. हा तयार रस आठवड्यातून तीन वेळा सकाळी रिकाम्या पोटी प्या. त्यामुळे काही दिवसातच तुमची भूक वाढेल.
ओवा; पोटाच्या समस्यांवर ओवा हा फार आधीपासून चालत आलेला रामबाण उपाय आहे. यासाठी तुम्ही एका वाटीत थोडासा लिंबाचा रस घ्या, त्यात दोन ते तीन चमचे ओवा घाला. ते मिक्सर मध्ये वाटून घ्या आणि ते चांगले सुकवून घ्या. नंतर सुकल्यानंतर त्यात थोडे काळे मीठ घाला. आणि हे सर्व जेवण्याच्या अर्धा तास चावून घ्या आणि त्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या. हा एक सोप्पा उपाय भूक लागण्यावर आहे. काही जणांना आलं आणि ओवा अतिप्रमाणात खाल्ल्यानं त्रास होतो. वैद्याचा सल्ला घेऊनच उपाय करा .
मेथी आणि बडीशेप; काही जणांना जेवणानंतर मेथी आणि बडीशेप खाण्याची सवय असते. कारण या दोन्ही गोष्टी पचनासाठी चांगल्या असतात. यासाठी तुम्ही एक चमचा बडीशेप आणि अर्धा चमचा मेथी दोन कप पिण्याच्या पाण्यात काही वेळ भिजवून ठेवा. नंतर ते पाणी उकळायला ठेवा.त्या नंतर गाळून ते पाणी प्या. जर तुम्हाला आवडत असेल तर त्यात थोडे मध घाला. हे पेय रोज प्यायल्याने भूक न लागण्याची समस्या काही दिवसातच दूर होईल.
काळी मिरी; काळी मिरी भूक न लागण्यावर उपायकारक ठरते. यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये अर्धा चमचा ठेचलेली काळी मिरी घ्यावी लागेल. त्यात थोडासा गुळ घाला, काही दिवसातच तुम्हाला फरक दिसून येईल.
टीप : हा लेख सर्वसामान्यपणे उपलब्ध माहितीवर आधारित आहे. प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांना विचारूनच हे उपाय करा.