पुण्यात पोलीस शिपाई पदासाठी 39 हजार अर्ज, पण लेखी परीक्षेला निम्मेच विद्यार्थी हजर

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑक्टोबर । पुणे पोलिस दलात रिक्त असलेल्या शिपाई पदांच्या भरतीसाठी मंगळवारी लेखी परीक्षा पार पडली. अवघ्या 214 जागांसाठी 39,323 जणांनी अर्ज केले होते. मात्र, 79 केंद्रांवर पार पडलेल्या लेखी परीक्षेला यापैकी केवळ 12027 विद्यार्थीच उपस्थित राहिले. राज्यातील पोलीस भरतीप्रक्रिया रखडण्याच्या अनुभवामुळे उमेदवारांमध्ये परीक्षाच न देण्याची उदासीनता दिसून आली का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

तर दोन केंद्रांवर लेखी परीक्षेसाठी डमी उमेदवार बसवल्याच्या घटना उघड झाल्या. याप्रकरणी सिंहगड रोड आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे.

या भरती प्रक्रियेत पहिल्यांदाच शारीरिक चाचणीच्या अगोदर लेखी परीक्षा घेण्यात आली. त्यासाठी 22 सप्टेंबरपासून उमेदवारांना ऑनलाइन प्रवेशपत्र मिळायला सुरुवात झाली होती. आयुक्तालयाची लेखी परिक्षा जी. एस. सॉफ्टवेअर कंपनीमार्फत राबविण्यात आली. आरोग्य विभागाच्या परीक्षांबाबत उडालेल्या गोंधळानंतर ही परीक्षा सुरळीत पार पडणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. मात्र, परीक्षा सुरळीत पार पडल्याने संबंधित यंत्रणांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जानेवारी महिन्यात पोलीस खात्यात 12538 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. पहिल्या टप्प्यात 5300 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडेल. तर उर्वरित जागा या दुसऱ्या टप्प्यात भरण्यात येतील, असे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले होते. मात्र, मराठा आणि आता ओबीसी आरक्षणाच्या तिढ्यामुळे ही भरती प्रक्रिया लांबणीवर पडली आहे.

यापूर्वी 2019 साली पोलीस भरती प्रक्रियेत करण्यात आलेल्या बदलांविरोधात पुण्यात मोर्चा काढण्यात आला होता. पोलीस भरतीसाठी आधी 100 गुणांची मैदानी चाचणी घेतली जात होती.त्यामध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जात असे. अशाप्रकारे 200 गुणांतून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्यांची निवड केली जात असे. पण आता राज्य सरकारने यामध्ये बदल केला होता. लेखी परीक्षा मैदानी चाचणीच्या आधी घेण्यात येणार आहे. तसेच मैदानी चाचणीचे गुण 100 वरुन 50 करण्यात आले होते. या निर्णयावर अनेक विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला होता.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागात होणारी गट क आणि ड वर्गाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 8 आणि 9 सप्टेंबरला ही परीक्षा होणार होती. मात्र, परीक्षेचं कंत्राट दिलेल्या कंपनीच्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. एकूण 6 हजार 185 पदांसाठी ही भरती परीक्षा होणार होती. त्याऐवजी आता 25 सप्टेंबर गट क आणि 26 सप्टेंबरला गट ड संवर्गाची परीक्षा होणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *