Load shedding in Maharashtra: राज्यावर भारनियमनाचे संकट गडद

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑक्टोबर । वाढत्या तापमानामुळे (October heat) विजेच्या मागणीत वाढ होत आहे. परिणामी विजेची मागणी, उपलब्धता यातील तफावत भरून काढण्यासाठी उपाययोजना व विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. दुसरीकडे देशात कोळशाच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा (coal shortages) निर्माण झाला असून, महावितरणनेवीजपुरवठ्याचा करार केलेल्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाअभावी वीज निर्मितीमध्ये घट सुरु आहे.

सद्यस्थितीत विजेची उच्चतम मागणी सुमारे १७ हजार ५०० ते १८ हजार मेगावॅट आहे. महावितरणने औष्णिक वीज निर्मिती केंद्रांसोबत २१ हजार मेगावॅट वीज पुरवठ्याचा करार केला आहे. मात्र करारातून ११ हजार ४०० मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. त्यामुळे विजेच्या मागणीची पुर्तता करण्यासाठी अपारंपरिक व इतर ऊर्जा स्त्रोतांकडून ३ हजार मेगावॅट घेण्यात येत आहे. सोबत कोयना जलविद्युत निर्मिती प्रकल्पामधून १९०० मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येत आहे. तर उर्वरित १५०० ते २००० मेगावॅट विजेची तूट ही पॉवर एक्सचेंजमधून वीज खरेदीद्वारे भरून काढण्यात येत आहे.

कोळसा टंचाईमुळे वीज निर्मितीवर परिणाम झाला आहे. परिणामी विजेची मागणी सर्वाधिक असलेल्या सकाळ, संध्याकाळी विजेचा वापर काटकसरीने करावा. अनावश्यक वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या कालावधीत विजेचा वापर कमी झाल्यास मागणी व उपलब्धता यातील तफावत कमी होईल. भारनियमन करण्याची गरज भासणार नाही.

ऑक्टोबरमधील उष्मा जाणवू लागला आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत वाढ होत आहे. ही वाढ आणखी अपेक्षित असल्याने व विजेची वाढती तूट भरून काढण्यासाठी कृषि वाहिन्यांवर प्रतिदिन ८ तास दिवसा किंवा रात्री चक्राकार पद्धतीने थ्री फेज वीजपुरवठा करण्यात येत आहे. मागणीनुसार विजेचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर कृषिवाहिन्यांवरील वीजपुरवठ्याचा कालावधी पूर्ववत करण्यात येणार आहे.

– देशभरातील कोळसा टंचाईमुळे पॉवर एक्सचेंजमधून पुरेशी वीज उपलब्ध होत नाही.
– परिणामी इतर राज्यांतील विजेच्या वाढत्या मागणीमुळे विजेचे सरासरी दर १२ ते १४ रुपये प्रतियुनिटपर्यंत गेले.
– विजेच्या कमाल मागणीच्या कालावधीत हे दर प्रतियुनिट २० रुपयांपर्यंत जात आहेत.
– मागणी व उपलब्धता यात ताळमेळ ठेवण्यासाठी आवश्यकतेप्रमाणे वीज खरेदी करून भारनियमन टाळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *