महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑक्टोबर । शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरु झाला असून पहिल्याच दिवशी सोने चांदीमध्ये तेजी दिसून आली. आज सोन्याचा भाव ११० रुपयांनी तर चांदी ५०० रुपयांनी महागली आहे. लग्नसराईच्या खरेदीसाठी ग्राहक नवरात्रीमध्ये सराफा बाजारात येत असल्याने सराफा व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४६८८१ रुपये आहे. त्यात २६ रुपयांची किंचित घसरण झाली. तत्पूर्वी सोन्याचा भाव ४६९९० रुपयांपर्यंत वाढला होता. एक किलो चांदीचा भाव ६१५०७ रुपये आहे. त्यात ५०६ रुपयांची वाढ झाली आहे.
आज सकाळी चांदीने ६१००० रुपयांपर्यंत मजल मारली होती. कमॉडिटी बाजारात या आधी सोमवारी तसेच शुक्रवारी सोने आणि चांदीमध्ये घसरण दिसून आली होती. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार सोमवारी सोने ४६६८२ रुपयांवर बंद झाले होते. चांदीचा भाव ६०९०५ रुपये होता. गेल्या आठवडाभरात सोने ८५० रुपयांनी तर चांदी १३०० रुपयांनी महाग झाली.
Goodreturns या वेबसाईटनुसार आज गुरुवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५९०० रुपये आहे. २४ कॅरेटचा भाव ४६९०० रुपये इतका वाढला. त्यात २२० रुपयाची वाढ झाली. आज दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५९५० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ५०१३० रुपये झाला आहे. त्यात २०० रुपयांची वाढ झाली. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४४११० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८१२० रुपये आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४६३०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९००० रुपये आहे. त्यात बुधवारच्या तुलनेत ३०० रुपयांची वाढ झाली.