महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑक्टोबर । भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने T20 संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला आहे. T20 विश्वचषक स्पर्धेनंतर आपण T20 संघाचे कर्णधारपद सोडणार असल्याचे कोहलीने सांगितले आहे. त्याची जागा कोण घेणार? नवा कर्णधार कोण असेल? याबाबत तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. कोहलीची जागा रोहित शर्मा घेईल असं अनेकांना वाटते आहे. रोहित शर्मा हा संघाचा उपकर्णधार असून त्याच्याच गळ्यात माळ पडावी अशी प्रार्थना त्याचे चाहते करत आहेत, मात्र रोहितचं हे स्वप्न भंगण्याची शक्यता आहे, कारण त्याच्याऐवजी 24 वर्षांच्या क्रिकेटपटूला ही संधी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंत याने गेल्या काही महिन्यात उत्तम कामगिरी केली आहे. 24 वर्षांच्या रिषभ पंतने ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यात चिवट आणि झुंजार खेळी साकारल्या होत्या. महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीनंतर त्याची जागा घेणं कोणत्याही क्रिकेटपटूसाठी सोपी गोष्ट नव्हती. सुरुवातीला यष्टीरक्षण आणि फलंदाजी या दोन्हीमध्ये चाचपडणाऱ्या रिषभने आपल्या तंत्रात बरीच सुधारणा केली आहे.
धुरंदर फलंदाज माघारी परतल्यानंतरही कधी चिवट तर कधी स्फोटक फलंदाजी करत हातातून निसटलेले सामने रिषभने विजयपथावर नेऊन ठेवण्याची कमाल दाखवली होती. त्याच्या या कामगिरीमुळे त्याच्या गळ्यात दिल्ली कॅपिटल्स या IPLमधील संघाची कर्णधार पदाची माळ घालण्यात आली होती. यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सचा संघ हा अव्वल स्थानी असून या संघाने 13 पैकी फक्त 3 सामने गमावले आहेत.
रोहित शर्मा हा 34 वर्षांचा असून तोही येत्या काही वर्षात निवृत्त होईल. तेव्हा पुन्हा नवा कर्णधार निवडावा लागणार असल्याने आताच तरुण क्रिकेटपटूला संधी दिली जावी असा एक मतप्रवाह आहे. यष्टीरक्षक जर कर्णधार असेल तर त्याचा संघाला फायदा होतो हे धोनीने दाखवून दिलं आहे. 2007 साली धोनीकडे कर्णधारपद आल्यानंतर त्याने 2 विश्वचषक आणि एक चॅम्पिअन्स ट्रॉफी भारताला मिळवून दिली होती. मैदानातील इतर क्रिकेटपटूंपेक्षा यष्टीरक्षक स्थितीचं नीट आकलन करू शकतो, हे देखील रोहितऐवजी रिषभला पसंती मिळण्याचे आणखी एक कारण आहे.