महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ८ ऑक्टोबर । पाणीपुरी म्हटलं की जिभेला पाणी सुटल्याशिवाय राहत नाहीत. तुम्ही कधी ‘बाहुबली पाणीपुरी’बद्दल ऐकलंय का? सध्या नागपूरच्या बाहुबली पाणीपुरीने सर्व खवय्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रसिद्ध फ़ूड ब्लॉगर लक्ष दादवानी यांनी या हटके पाणीपुरीचा व्हिडीओ युटयूबवर शेअर केलाय. प्रताप नगर परिसरात ‘चिराग का चस्का’ नावाचे एक स्ट्रीट फूड स्टॉल आहे. तिथे ही हटके बाहुबली पाणीपुरी मिळते. ही पाणीपुरी बाहुबलीसारखीच मोठय़ा आकाराची असून तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बाहुबली पाणीपुरीमध्ये चिंचेची चटणी, संत्र्याचं तसेच जिरे आणि लसणाचं पाणी असतं. बटाटय़ाचं सारण पाणीपुरीच्या वरच्या एका मोठय़ा दंडगोलाकार भागावर ठेवले जाते. नंतर दही, बुंदी, शेव आणि डाळिंबाच्या दाण्यांनी पाणीपुरी सजवले जाते. भलीमोठी पाणीपुरी खाताना खवैयांना कसरत करावी लागते, हे मात्र नक्की. सोशल मीडियावर या पाणीपुरीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत असून आतापर्यंत 3 कोटी 20 लाख लोकांनी व्हिडियो बघितला आहे.