![]()
महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर । श्री देव गणपतीपुळे मंदिरात दर्शनाकरिता भाविकांच्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. दिवसातून बारा तास मंदिर दर्शनाकरिता उपलब्ध करून दिले जाणार असून कोरोनाचे नियम पाळून ही दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
पहाटे पाच वाजल्यापासून गणपतीपुळे मंदिर खुले होणार आहे. मंदिरातील पूजाअर्चा झाल्यानंतर सर्वप्रथम स्थानिकांना दर्शनाची संधी दिली जाईल. त्यानंतर सकाळी सात ते दुपारी बारा, दुपारी एक ते सायंकाळी सात आणि सायंकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. साधारण दर दिवशी सहा हजार भाविकांना या काळात दर्शन मिळणार आहे. मंदिर सुरू झाल्यानंतर पहिले दोन दिवस भाविकांकडून फारसा प्रतिसाद लाभला नाही, परंतु पुढील काळात भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता मंदिर व्यवस्थापन समितीने व्यक्त केली आहे.