” बाळासाहेबांनी खोटं बोलणाऱ्यांना काढूनही टाकलेलं लक्षात असुदे ” ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर । आज सिंधुदुर्ग विमानतळाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी नारायण राणे यांचं उद्धव ठाकरे यांच्याबाबतचं वादग्रस्त वक्तव्य आणि त्यानंतर त्यांचं अटकसत्र या पार्श्वभूमीवर आजचा हा कार्यक्रम आणि त्यांचं एका मंचावर येणं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं आहे. ते दोघेही काय बोलतात याकडेही जनतेचं लक्ष लागून राहिलेलं होतं.

यावेळी नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या दोघांनीही एकमेकांना जोरदार टोले लगावले आहेत. सुरुवातीला भाषण करताना नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमध्ये झालेल्या विकासामध्ये आपण केलेल्या कामाचा उल्लेख केला. हे उल्लेख करताना त्यांनी शिवसेनेला अनेक टोले देखील लगावले आहेत. दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील नारायण राणे यांना अनेक टोले लगावले आहेत. त्यांनी म्हटलंय की, नारायण राणेजी, तुम्ही म्हणालात की, बाळासाहेबांना खोटं बोललेलं आवडायचं नाही. हे खरंय मात्र, बाळासाहेबांनी खोटं बोलणाऱ्यांना त्यावेळी काढून टाकलं होतं, हेही लक्षात असुदे. लघु का असेना , मोठं का असेना एक मोठं खातं तुमच्याकडे आलंय. त्याचा वापर महाराष्ट्राच्या विकासासाठी तुम्ही कराल, अशी आशा आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

दुसरीकडे राणे यांनी आपल्या मनोगतात म्हटलंय की, विमानतळ नको म्हणून आंदोलन करणारे सध्या मंचावर आहेत. विमानतळावरुन उतरल्यावर जनतेनं काय खड्डे बघायचे का? आदित्य ठाकरे माझ्यासाठी टॅक्स फ्री आहेत. लोकप्रतिनिधी काय करतात, हे जाणून घेण्यासाठी कुणाला तरी नेमा, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. तसेच विनायक राऊतांनी पेढ्याचा गुणधर्म आत्मसात करावा, असा सल्लाही त्यांनी दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *