Weather Forecast: पुढील काही तासांत पुण्यासह या जिल्ह्यात धडकणार मुसळधार पाऊस

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ९ ऑक्टोबर । दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत मान्सूनच्या पावसानं जोरदार हजेरी (Heavy rainfall in maharashtra) लावली आहे. यानंतर आता राजस्थान आणि गुजरातसह उत्तरेतील काही राज्यातून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. पण महाराष्ट्रात अजूनही नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा जोर सुरू आहे. आज राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सहा जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट देण्यात आला आहे.

खरंतर, आज सकाळपासूनच पुणे, नाशिक, अहमदनगर, धुळे, सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद, बीड, परभणी आणि नांदेड या दहा जिल्ह्यात ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. संबंधित जिल्ह्यावर तीव्र पावसाचे काळे ढग घोंघावत आहेत. पुढील तीन ते चार तासांत याठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या तज्ज्ञांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागानं आज सहा जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र येलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य मराठवाड्यातील काही भाग, पालघर, पुणे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांवर मध्यम ते तीव्र ढग घोंघावत असल्याची माहिती हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. तसेच अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याचंही होसाळीकर यांनी सांगितलं आहे.

उद्यापासून मात्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. उद्या पुण्यासह मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यात उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. बुधवारी 13 ऑक्टोबर रोजी राज्यात कोरडं हवामान राहणार असून यादिवशी हवामान खात्यानं कोणताही इशारा दिला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *