T20 World Cup: हार्दिक पंड्या फिटनेसमुळे बाहेर जाण्याची शक्यता; ‘या’ दोन नावांची चर्चा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑक्टोबर । टी २० वर्ल्डकपच्या पात्रता फेरीच्या सामन्यांना १७ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. तर भारताचा सुपर १२ मधील पहिला सामना २४ ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध आहे. त्यात हार्दिक पंड्याच्या फिटनेसबाबत टीम इंडियाची चिंता वाढली आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्याने आयपीएल २०२१ स्पर्धेत मुंबईकडून खेळताना एकही चेंडू टाकला नव्हता. त्यामुळे वर्ल्डकपमध्ये त्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आयसीसी नियमांनुसार बीसीसीआयला संघात बदल करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंतचा अवधी आहे. त्यामुळे हार्दीक पंड्या फिट नसल्याच्या त्याच्याऐवजी संघात दुसऱ्या खेळाडूला स्थान मिळण्याची शक्यता आहे. या शर्यतीत शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर या दोन खेळाडूंची नावं आघाडीवर आहेत. या दोन्ही खेळाडूंना संघात राखीव खेळाडू म्हणून निवडलं आहे.

शार्दुल ठाकुर सध्या चांगल्या फॉर्मात आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने गोलंदाजी आणि फलंदाजीत महत्त्वाचं योगदान देत भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. इंग्लंड दौऱ्यातही त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. २९ वर्षीय शार्दुलने चार कसोटी सामने, १५ एकदिवस आणि २२ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्याने कसोटीत १४, एकदिवसीय सामन्यात २२ आणि टी २० मध्ये ३१ गडी बाद केले आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय सामन्यात शार्दुलने १४४.५ च्या धावगतीने १०७ धावा केल्या आहेत. टी २० स्पर्धेत त्याने ६९ धावा केल्या असून धावगती १९७.१४ आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत शार्दुलने आतापर्यंत १५ सामन्यात १८ गडी बाद केले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *