महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑक्टोबर । शिवसेनेचा दसरा मेळावा महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणाला नवी दिशा देतो. त्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या मेळाव्याकडे लागलेले असते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अखंडपणे सुरू आहे. कोरोना संकटामुळे गेल्या वर्षी दसरा मेळावा शिवतीर्थाऐवजी जवळच्याच स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात घेण्यात आला होता. यंदा तो माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात घेतला जाणार असून षण्मुखानंदच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरे हे शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी आणि महाराष्ट्राला मार्गदर्शन करणार आहेत.
शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी ही माहिती दिली. कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन करत बहुतांश व्यवहारही पूर्ववत सुरू झाले आहेत. त्यानंतरही सुरक्षेची काळजी मात्र घ्यावीच लागणार आहे. शुक्रवार 15 ऑक्टोबरला विजयादशमी आहे. त्या दिवशी शिवसेनेचा दसरा मेळावा षण्मुखानंद सभागृहात मोजक्या नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला शिस्तीने गुलाल उधळत शिवसैनिक शिवतीर्थावर पोहोचतात. या वेळी सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळावा बंद सभागृहात होत असला तरी शिवसैनिकांमध्ये तोच जोश आणि उत्साह आहे. षण्मुखानंद सभागृहात कोरोना नियमावलीची शिस्त पाळून मोजक्या शिवसैनिकांच्या उपस्थितीत मेळावा होईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. सर्वांनाच या मेळाव्याला उपस्थित राहता येणार नसले तरी पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विचार सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून देशाच्या कानाकोपऱ्यात निश्चितच पोहोचतील, असा ठाम विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.