हवामान परतीच्या मॉन्सूनसाठी पोषक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑक्टोबर । मॉन्सूनच्या परतीचा प्रवास काहीसा वेगाने सुरू आहे. तर महाराष्ट्रातील बऱ्याच भागातून मंगळवारी मॉन्सूनने माघार घेतली आहे. त्यामुळे आता राज्याच्या बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिली आहे. सध्या परतीच्या मॉन्सूनसाठी पोषक हवामान निर्माण झाले असून पुढील दोन दिवसात राज्याच्या आणखी काही भागांतून मॉन्सून माघारी फिरेल. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. पुढील चार ते पाच दिवस शहरात मुख्यतः हवामान कोरडे असून दुपारनंतर अंशतः ढगाळ वातावरणाची शक्यता आहे.

पुणे शहर आणि परिसरात ही पुढील आठवडाभर आकाश मुख्यतः निरभ्र राहणार असल्याचे हवामान विभागाने वर्तविले आहे. मंगळवारी शहरात ३२.२ अंश सेल्सिअस कमाल तर २० अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाने काढता पाय घेतला आहे. राज्यात मंगळवार सकाळपर्यंतच्या २४ तासात कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली. तर नाशिक, औरंगाबाद, नांदेडच्या उत्तरेकडील भागातून मॉन्सून बाहेर पडला आहे. तर बुधवारी (ता.१३) कोकणातील काही भागात, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मात्र, उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहणार आहे.

बंगालच्या उपसागरात पुढील ४८ तासांमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार असून त्याची तीव्रता वाढून ही प्रणाली ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच अरबी समुद्र व परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यापासून बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामी दक्षिण भारतातील राज्यांसह मध्य महाराष्ट्र तुरळक, कोकणच्या काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे.

राजस्थानातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास हा उशिरा सुरू झाला. हवामान विभागाने जाहीर केलेल्या नवीन वेळापत्रकानुसार १७ सप्टेंबर ही मॉन्सून परतण्याची दीर्घकालीन सर्वसाधारण तारीख होती. मात्र मॉन्सूनच्या परतीचा प्रवास हा ६ ऑक्टोबरला सुरू झाला होता. त्यामुळे परतीचा प्रवास हा सर्वसाधारण वेळेपेक्षा तब्बल १९ दिवस लांबला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *