राज्यात ‘नो लोडशेडिंग’ हेच धोरण : ऊर्जामंत्री नितीन राऊत

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १३ ऑक्टोबर । राज्यात कोळशाच्या टंचाईमुळे भारनियमनाचा सामना करावा लागेल, असे चित्र असले तरी ऊर्जाविभागाच्या उपाययोजनांमुळे राज्यात ‘नो लोडशेडिंग’ हेच महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे, असा विश्वास ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत जनतेला दिला. तसेच, केंद्राकडून राज्याला योग्य प्रमाणात कोळशाचा पुरवठा केला जात नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ऊर्जामंत्री म्हणाले की, देशातील कोळसा टंचाईमुळे राज्यात मागणीच्या तुलनेत तीन हजार मेगावॉट विजेची तूट जाणवत आहे. टंचाईवर मात करण्यासाठी गरजेनुसार महागडी वीजही खुल्या बाजारातून खरेदी करून ग्राहकांना वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे राज्यात कुठेही भारनियमन केले जात नसून ग्राहकांनी वेळेत बिल भरून महावितरणला सहकार्य करावे. जनतेने सकाळ व संध्याकाळी ६ ते १० या वीज मागणीच्या कमाल कालावधीत आपल्या घरातील विद्युत उपकरणांचा कमीत कमी वापर करावा, अशी विनंतीही राऊत यांनी नागरीकांना केली.

कोळसा टंचाईमुळे भुसावळ (२१० मेगावॉट), चंद्रपूर (५०० मेगावॉट), पारस (२१० मेगावॉट), नाशिक (२१० मेगावॉट) असे चार संच सध्या बंद आहेत. तसेच नियमित देखभाल व दुरूस्तीसाठी तीन संच बंद आहेत. असे एकूण २७ पैकी केवळ सातच संच बंद असून भारनियमनाचा धोका नसल्याचा दिलासा ऊर्जामंत्र्यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *