महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑक्टोबर । मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलताना शिवसेनापक्षप्रमुख, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशातील राजकीय सद्यस्थिती, हिंदुत्व, महाराष्ट्रातील आणि देशातील भाजपचे राजकारण, लखीमपूर खेरी घटना, शेतकरी आंदोलन आदी बाबींवर कटाक्ष टाकला.
उद्धव ठाकरे म्हणाले, आमचा आवाज दाबणारे जन्माला आले नाहीत आणि कधीच जन्माला येऊ शकत नाही. विजयादशमीच्या शुभेच्छा सर्वांना देऊन, बऱ्याच दिवसानंतर शिवसैनिकांना संबोधण्याची संधी मिळाल्याने आजचा क्षण मोलाचा आहे. जी परंपरा शिवसेनाप्रमुखांनी 60 च्या सुरू केली, ती आपण सर्व जण पुढे घेऊन जात आहोत याचा अभिमान वाटत असल्याचे ते म्हणाले. शस्त्रपूजन झाल्यानंतर मी खऱ्या शस्त्रांची पूजा केली, माझी खरी शस्त्रे म्हणजे माझे शिवसैनिक असल्याचेही ते म्हणाले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना ठाकरे म्हणाले, मला स्वतःला मी मुख्यमंत्री आहे असं कधीही वाटू नये, मी तुमच्या घरातलाच कोणीतरी आहे, तुमचा भाऊ आहे, असंच मला वाटलं पाहिजे. पण, काही जणांना असं वाटतं की मी मुख्यमंत्रीच आहे. मी पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणू लागलेत की मी गेलोच नाही!
परंतु जी काही संस्कृती असते अथवा जे काही संस्कार ते माझ्या आईवडिलांनी, माझ्या आजोबांनी मला शिकवलेले आहेत. पदे येतील जातील, सत्ता येईल जाईल. परंतु, कधीच मी काहीतरी आहे हा अहंपणा माझ्या डोक्यामध्ये जाऊ देऊ नको हे संस्कार मला माझ्या कुटुंबियांनी दिले आहेत, असे ते म्हणाले.