“मी आताच माझा कोणताही वारसा सोडून जात नाहीय…” धोनीने उत्तर दिलं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑक्टोबर । दसऱ्याच्या मुहूर्तावर चेन्नईने विजयाचं सोनं लुटलं. चौथ्यांदा चेन्नईने आयपीएलचा करंडक उंचावला. एम एस धोनीचं निर्विवाद वर्चस्व यानिमित्ताने पुन्हा सिद्ध झालं. काल आयपीएलचा करंडक उंचावून स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात यशस्वी संघाचा कर्णधार म्हणून धोनीने विक्रम केला. चेन्नईला चौथ्यांदा चॅम्पियन बनवल्यानंतर धोनी आयपीएल जिंकणारा सर्वात जास्त वयाचा कर्णधारही बनला आहे. चेन्नईने ट्रॉफी जिंकल्यानंतर सगळ्या जगाला एकच प्रश्न पडला, धोनीने एकदिवसीय, कसोटी आणि टी 20 अशा क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. अशा परिस्थितीत, आयपीएल खेळणारा धोनी आता यापुढचं पर्व खेळणार का?, वयाची चाळीशी ओलांडलेला धोनी आयपीएलचा पुढील हंगाम खेळेल का? फॅन्सच्या याच प्रश्नाचं उत्तर ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनीने देण्याचा प्रयत्न केला.

दुबईमध्ये कोलकात्याविरुद्ध 27 धावांनी अंतिम सामना जिंकल्यानंतर, पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये कॉमेंटेटर हर्षा भोगले यांनी एम एस यांच्याशी संवाद साधला. यावेळी हर्षा यांनी जगाला पडलेला प्रश्न विचारला, पण तो जरा वेगळ्या पद्धतीने, परंतु हुशार माहीला प्रश्नाचा रोख कळाला… त्यानेही हर्षा भोगलेंच्या प्रश्नाला त्याच्याच स्टाईलमध्ये उत्तर दिलं. पण हे उत्तर देताना मात्र आपल्या फॅन्सना योग्य मेसेज जाईन, याची त्याने काळजी घेतली.

धोनी पुढचा हंगाम खेळणार की नाही?
आयपीएलची चौथी ट्रॉफी जिंकल्यानंतर धोनी आणि टीम अतिशय उत्साहात होती. टीमच्या विजयाचं सेलिब्रेशनही चेन्नईने जोरदार केली. पण सगळ्या फॅन्सना एकच प्रश्न होता, धोनी पुढचा हंगाम खेळणार का?, अखेर ती वेळ आली… हर्षा भोगले म्हणाले, “धोनी, तू जो वारसा सोडून जातोय, त्याच्यावर तुला अभिमान वाटेल, गर्व वाटेल?”… या प्रश्नानंतर धोनीने क्षणाचाही वेळ न दवडता उत्तर दिलं, “मी आताच माझा कोणताही वारसा सोडून जात नाहीय…”

“मी आताच माझा कोणताही वारसा सोडून जात नाहीय…”, या वाक्यामधला ‘आताच’ हा शब्द फार महत्त्वाचा होता. याच शब्दावरुन फॅन्सनी अंदाज बांधायला सुरुवात केली किंबहुना शिक्कामोर्तबही केलं की, धोनी पुढचा हंगाम नक्की खेळणार!

धोनी पुढचा हंगाम खेळेल की नाही, हे येणारा काळ ठरवेल, पण आता पुढच्या काही दिवसांनी टी ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धा सुरु होतीय. धोनीकडे संघाच्या मेन्टॉरपदाची जबाबदारी असेल. त्याला संघाला गाईड करायचंय. आता चेन्नईला ट्रॉफी जिंकवून दिल्यावर धोनीचा आत्मविश्वास सातव्या मंजिलवर असेल. त्यामुळे भारतीय संघालाही यंदाच्या साली जगज्जेता बनविण्यासाठी धोनी पुरेपूर प्रयत्न करेल, हे नक्की…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *